मनपाला 4 कोटीचे कर वसुलीचे उद्दिष्ट : वसुलीसाठी मनपा कर्मचाऱ्यांची धडपड
प्रतिनिधी/ बेळगाव
व्यापार परवाना कर तसेच वार्षिक कर जमा करण्यासाठी महानगरपालिकेला 4 कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपडू लागले आहेत. गेल्या चार महिन्यांत 89 लाखाचा कर जमा करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
शहरामध्ये अनेक व्यावसायिकांनी परवानाच घेतला नव्हता. त्यामुळे त्यांना दंड आकारण्यात आला आहे. परवाना घेण्यासाठी जनजागृती केली जात आहे. याचबरोबर तातडीने त्यांना परवाना देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामधून अधिक कर मिळविण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी कामाला लागले आहेत. शहरातील अनेक ठिकाणी भेटी देऊन परवान्यांची पाहणी करण्यात येत आहे. काहीजणांनी परवाना घेतला तरी त्याचे नूतणीकरच केले नाही. त्यांच्याकडूनही कर व दंड आकारला जात आहे.
एप्रिल 2023 ते जुलै अखेरपर्यंत 89 लाख रुपयांचा कर जमा करण्यात आला आहे. एकूण 4 कोटीचे उद्दिष्ट असून त्यासाठी आणखी 8 महिने बाकी आहेत. पहिल्या टप्प्यात हा मोठ्या प्रमाणात कर जमा झाला आहे. मात्र आणखी दोन टप्प्यांमध्येही अधिक प्रमाणात कर वसूल करून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. ऑनलाईन पद्धतीनेच परवाना दिला जात आहे. याचबरोबर करदेखील अधिक प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने वसूल केला जात आहे. काहीजण मात्र अजूनही प्रत्यक्ष उपस्थित राहून रोख रक्कम भरताना दिसत आहेत.









