ऑनलाईन टीम / मुंबई :
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प केला होता. मात्र, हा संकल्प आता फोल ठरताना दिसत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या 23 दिवसातच राज्यात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शपथ घेऊन आज 23 दिवस पूर्ण होत आहेत. तरीही अजून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राज्याच्या कोणत्याही खात्याला मंत्री मिळालेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा संकल्प जाहीर करूनही राज्याला अद्याप कृषिमंत्री मिळालेला नाही.
एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेचा खेळ सुरु होता तर दुसरीकडे राज्यातील बळीराजा हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत होता. अतिवृष्टी, पूर अशी परस्थिती ओढावली असताना अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये पंचनाम्यांना देखील सुरवात झालेली नाही. नापिकी, कर्जबाजारीपणा यातून नैराश्य आल्याने शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे.
मराठवाडा विभागात 54 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. मराठवाड्यानंतर यवतमाळमध्ये 12, जळगाव 6, बुलाढाणा 5, अमरावती 4, वाशिम 4, अकोला 3 तर चंद्रपूर-भंडारामध्ये 2 शेतकऱ्यांनी अशा राज्यात एकूण 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
हेही वाचा : देशाच्या ध्वज संहितेत मोठा बदल, आता 24 तास मानाने फडकवा तिरंगा