कणकवली तहसिलदार कार्यालयाचा उपक्रम
कणकवली / प्रतिनिधी
महसुल सप्ताहाच्या निमित्ताने महसुल प्रशासनामार्फत एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत तालुक्यातील ८८ लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले बुधवारी घरपोच देण्यात आले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार महसुल दुतांच्या माध्यमातून हे दाखले विविध गावांमध्ये लाभार्थ्यांपर्यंत पोहोच करण्यात आले.
तालुक्यात प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्यामार्फत विविध दाखले घरपोच करण्याचा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील जे नागरीक दुर्गम भागात राहत आहेत, त्यांना दाखले काढण्यासाठी बरेच अंतर पार करून यावे लागते. अशा नागरीकांना महसुल दूतांमार्फत घरपोच दाखले देण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. याबाबत नागरीकांनी समाधान व्यक्त केले. तसेच नागरीकांना महसुलबाबत काही समस्या असल्यास तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.









