म. ए. समिती प्रबळ उमेदवार देणार : आज किंवा उद्या होणार निवड
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार निवडीसाठी 88 जणांची निवड कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीची बैठक मंगळवारी अथवा बुधवारी होण्याची शक्यता आहे. जनमताचा कौल घेऊन दक्षिण मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित केला जाणार आहे. दक्षिण मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचा दबदबा आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही अधिक आहे. उमेदवार निवडीची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी 5 सदस्यांच्या समितीने 83 जणांची निवड कमिटी स्थापन केली आहे. म. ए. समितीचे निष्ठावान कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी, वकील या सर्वांचा समावेश या निवड कमिटीमध्ये करण्यात आला आहे. दक्षिण मतदारसंघासाठी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार शुभम शेळके, नगरसेवक रवी साळुंखे, आप्पासाहेब गुरव, वल्लभ गुणाजी, अॅड. रतन मासेकर, मदन बामणे, मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुसकर यांनी अर्ज केले होते. या सर्वांचे अर्ज स्वीकारल्यानंतर निवड कमिटी स्थापन करण्यासाठी 5 जणांची कमिटी नेमण्यात आली. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक विभागातील सदस्य निवड कमिटीमध्ये असतील, अशा दृष्टीने ती तयार करण्यात आली आहे. मंगळवार दि. 11 पासून उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात निवड कमिटीच्या सदस्यांची बैठक बोलाविली जाणार आहे. त्यानंतर मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे मंगळवारच्या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
उत्तरसाठी 34 जणांची निवड कमिटी
बेळगाव उत्तर मतदारसंघासाठी एकूण 34 जणांची निवड कमिटी स्थापन करण्यात आली आहे. ही निवड कमिटी जनमताचा कौल घेऊन उमेदवाराची निवड करणार आहे. उत्तरसाठी नगरसेवक शिवाजी मंडोळकर व अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. निवड कमिटीनुसार उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
परवानगीसाठी हेलपाटे
उमेदवार निवडीसाठी निवड कमिटी करण्यात आली असली तरी बैठक घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळालेली नाही. रविवारी सकाळी परवानगीसाठीचे पत्र देऊनदेखील सोमवारी रात्री उशिरापर्यंत बैठकीसाठी परवानगी मिळाली नाही. मंगळवारी सकाळी परवानगी मिळाल्यास दुपारच्या सत्रात अथवा बुधवारी निवड कमिटीची बैठक होण्याची शक्यता आहे.









