प्रतिनिधी/ बेळगाव
पर्यटनासाठी परदेशात सफर करण्याचे स्वप्न साकार करणाऱया पासपोर्टधारक बेळगावकरांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील 6 महिन्यांपासून बंद असणारे बेळगावमधील पोस्ट – पासपोर्ट सेवा केंद्र 28 सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आले. एका महिन्याच्या कालावधीत 340 बेळगावच्या नागरीकांना पासपोर्ट काढून घेतला आहे. प्रत्येक दिवशी 25 जणांनाच्याच कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
पोस्ट विभागाच्या सहयोगाने बेळगाव व चिकोडी येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले. जिल्हय़ाची व्याप्ती मोठी असल्याने चिकोडीसाठी स्वतंत्र्य सेवा केंद्र देण्यात आले आहे. रायबाग, कुडची या परिसरात मुस्लीम समाज मोठय़ा संख्येने असल्याने दुबई, अमिरात या देशांमध्ये अनेकजण नोकरीनिमित्त आहेत. त्यामुळे चिकोडीसाठी स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. बेळगावमध्ये मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारात हे कार्यालय सुरू आहे.
दररोज 25 जणांना पासपोर्टच्या कागदपत्रांसाठी वेळ देण्यात येत आहे. परंतु काही जण अनुपस्थित तर काहींच्या कागदपत्रांमध्ये त्रृटी आढळत आहेत. त्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे कागदपत्रांच्या तपासणीसाठी 25 जणांची मर्यादा असली तरी एकूण पासपोर्ट काढणाऱयांची संख्या कमी आहे. सामाजिक अंतर राखून कागदपत्रांची तपासणी या ठिकाणी केली जात आहे.
ओळखीचा पुरावा
परदेशात जायचे असल्यासच पासपोर्ट काढावा, असा समज होता. परंतु हा समज आता दूर झाला असून ज्यांना भविष्यात परदेशवारी कराचीही नाही, असे नागरीक देखील पासपोर्ट काढताना दिसत आहेत. एक ओळखीचा पुरावा म्हणून देखील पासपोर्टची वापर सध्या करण्यात येत आहे.









