प्रभाग बारामध्ये सर्वाधिक 96टक्के मतदान : दोन्ही पॅनलकडून विजयाचा विश्वास व्यक्त
सांखळी : सांखळी पालिका निवडणुकीसाठी काल शुक्रवारी दिवसभर झालेल्या मतदानात 87.56 टक्के मतदान झाले. एकूण 6932 मतदारांपैकी 6070 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 3001 पुऊष तर 3069 महिला मतदारांनी हक्क बजाविला. स्थानिक आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सांखळी मतदारसंघातील या नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. काल शुक्रवारी मतदान शांततेत पार पडले. ही निवडणूक भाजप व टुगेदर फॉर साखळी या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
प्रभागनिहाय मतदानाची टक्केवारी
प्रभाग एक 633 (85.89टक्के ), प्रभाग दोन 665 (81. 50टक्के ), प्रभाग तीन 581 (88.97), प्रभाग चार 718 (83.78), प्रभाग पाच बिनविरोध निवड झालेली आहे. प्रभाग सहा 673 (86.62), प्रभाग सात 437 (93.58), प्रभाग आठ बिनविरोध झालेली आहे. प्रभाग नऊ 598 (84.58), प्रभाग दहा 547 (86.96), प्रभाग अकरा 594 (92.96), प्रभाग बारा 624 (96टक्के) मतदान झाले.
काँग्रेस कार्यकर्त्याच्या गाडीत रक्कम
प्रभाग क्रमांक सहामध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या गाडीत चाळीस हजार ऊपयांची रोख रक्कम सापडली. या प्रकरणी संबंधिताला ताब्यात घेण्यात आले होते, अशी माहिती डिचोली पोलीस अधिकारी सुरज गावस यांनी दिली. अन्य एका प्रभागात मतदार व उमेदवार यांच्यात बाचाबाची झाली. मात्र हा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. काही किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडली सकाळच्या सत्रात अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दरम्यान, दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे. निवडणूक अधिकारी रोहन कासकर, राजाराम परब व त्यांच्या पथकाने मतदान प्रक्रियेचे नियोजन चोख केले.
मुलीचाही विजय निश्चित : प्रवीण ब्लेगन
सांखळी बाजारामील प्रभाग 09 मध्ये 598 एवढे मतदान झाले आहे. तेथे आपली मुलगी भाग्यश्री ब्लेगन शंभर मतांची आघाडी घेऊन विजयी होईल, असा विश्वास टुगेदर फॉर सांखळी गटाचे प्रवीण ब्लेगन यांनी व्यक्त केला. तसेच मतदारांचा उत्साह पाहता आपल्या गटातील सर्व उमेदवार विजयी होऊन पालिकेत आम्ही सत्ता स्थापन करू, असाही दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.









