वृत्तसंस्था/ कोची
केरळचा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज 47 वर्षीय एम. सुरेशकुमार यांनी आपल्या निवासस्थानी फास लावून आत्महत्या केली आहे. अलपुझा येथे सुरेशकुमारचे वास्तव्य होते. बेडरूममध्ये सुरेशकुमार मृताअवस्थेत आढळले. सुरेशकुमार यांची पत्नी आणि मुलगा हे बाहेर काही कामानिमित्त गेले होते. या प्रकरणाची केरळच्या पोलीस खात्याकडून चौकशी केली जाणार आहे.
एम सुरेशकुमार हे दक्षिण रेल्वे विभागामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी राष्ट्रीय क्रिकेटमध्ये केरळ आणि रेल्वे संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 1991 ते 2005 या कालावधीत सुरेशकुमार यांनी 72 प्रथमश्रेणी सामने खेळताना 196 बळी घेतले आहेत. 1992 साली राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या संघामध्ये सुरेशकुमारचा समावेश होता.









