आयपीएस बनणारा सिंधुदुर्गचा तिसरा सुपुत्र
प्रतिनिधी / आचरा:
नुकत्याच पार पडलेल्या यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणारा सिंधुदुर्गचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर याची आय. पी. एस. (इंडियन पोलीस सर्व्हिस) साठी निवड झाली आहे. येत्या डिसेंबरपासून हैद्राबाद येथील सरदार वल्लभाई पटेल आय. पी. एस. ट्रेनिंग ऍकॅडमीमध्ये तो आय. पी. एस. अधिकारी पदाचे ट्रेनिंग घेण्यासाठी दाखल होणार आहे.
सिंधुदुर्गातील शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊन नंतर यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत आय. पी. एस. अधिकारी होणारे राजीव पांडे (सावंतवाडी), किरण चव्हाण (कुडाळ) यांच्यापाठोपाठ सुब्रमण्य केळकर (मालवण) हा सिंधुदुर्गचा तिसरा सुपुत्र ठरला आहे. गावात शिक्षण घेत असतानाच उदरनिर्वाहासाठी पौराहित्य करणाऱया सुब्रमण्यची ही वाटचाल खरोखरच प्रेरणादायी म्हणावी लागेल.
आय. ए. एस. साठीही प्रयत्न
मिळालेल्या यशाने हुरळून न जाता सुब्रमण्यने आय. ए. एस. बनण्यासाठीचे प्रयत्न देखील सुरू ठेवले आहेत. यासाठी त्याने पुन्हा एकदा यूपीएससीची पूर्व परीक्षा (प्रिलीम) दिली आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा देऊन आय. ए. एस. साठी अजूनही मोठे यश मिळवायचा प्रयत्न त्याने सुरूच ठेवला आहे. आय. पी. एस. चे ट्रेनिंग घेत असतानाच तो हा प्रयत्न करणार आहे. तूर्त आय. पी. एस. साठी त्याने महाराष्ट्र, तेलंगाणा, दिल्ली-गोवा अशी केडर चॉईस दिली आहेत. सुब्रमण्यच्या या यशाचे संपूर्ण जिल्हय़ात कौतूक होत आहे.









