निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जाहीर
आगरतळा / वृत्तसंस्था
त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सुमारे 86.10 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले सर्व 60 जागांवर एकाच टप्प्यात मतदान झाले. आता निवडणुकीचा निकाल 2 मार्चला लागणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये त्रिपुरामध्ये 90 टक्के मतदान झाले होते. 2018 च्या तुलनेत हय़ावेळी मतदान टक्केवारी 4 टक्क्यांची घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 60 जागा असलेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण 3,337 मतदान केंदे उभारण्यात आली होती. या निवडणुकीत 259 उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले आहे. ही निवडणूक 2023 ची पहिली निवडणूक आहे. गेल्या महिन्यात निवडणूक आयोगाने ईशान्य भारतातील त्रिपुरासह नागालँड आणि मेघालय या राज्यातील निवडणुकांची घोषणा केली होती.









