तीर, दगडी अवजार अन् हाडं हस्तगत
उत्तर डेन्मार्कच्या आरहूसच्या उपसागरात खोल पाण्यात पुरातत्वतज्ञांना 8500 वर्षे जुन्या वस्तीचे अवशेष मिळाले आहेत. याचा इतिहास एखाद्या टाइम कॅप्सूलप्रमाणे संरक्षित होता. काही दिवसांपूर्वी पाणबुडे डेन्मार्कमधील आरहूस शहरानजीक समुद्राच्या लाटांखाली सुमारे 26 फूट खोलवर उतरले होते आणि समुद्रतळावरून त्यांनी पाषाणयुगाच्या वस्तींचे पुरावे जमविले आहेत.
युरोपीय महासंघाकडून वित्तपोषित 15.5 दशलक्ष डॉलर्सच्या 6 वर्षीय आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या अंतर्गत बाल्टिक आणि उत्तर सागरात समुद्र तळाच्या काही हिस्स्यांचा नकाशा तयार करण्यासाठी संशोधक पाण्यात उतरले होते. या संशोधनात आरहूससोबत ब्रिटनचे ब्रॅडफोर्ड विद्यापीठ आणि जर्मनीच्या लोअर सेक्सोनी इन्स्टीट्यूट फॉर हिस्टोरिकल कोस्टल रिसर्चचे संशोधक सामील होते. समुद्रात सामावलेल्या उत्तर युरोपीय वसाहतींचा शोध लावणे हे लक्ष्य होते. याचदरम्यान लुप्त झालेल्या मध्यपाषाणकालीन वसाहतींचे अवशेष त्यांना मिळाले आहेत.
मागील हिमयुगानंतर वाढली सागराची पातळी
डेन्मार्कमध्ये पाण्यात उत्खननाचे नेतृत्व करणारे पुरातत्वतज्ञ पीटर मो एस्ट्रुप यांनी आतापर्यंत अशा वसाहतींचे बहुतांश पुरावे पाषाणयुगाच्या किनाऱ्यापासून दूर अंतर्गत स्थानांवर आढळून आल्याचे सांगितले. समुद्राच्या किनाऱ्यावर असलेली ही वस्ती होती. किनारी वस्तींमध्ये जीवन कशाप्रकारे होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. अंतिम हिमयुगानंतर विशाल हिमखंड वितळले अणि जागतिक समुद्रपातळी वाढली. यामुळे पाषाणयुगाच्या वस्ती जलमग्न झाल्या आणि मानवाला दूर पलायन करावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
100 वर्षांमध्ये 6 फूटांनी वाढ
सुमोर 8500 वर्षांपूर्वी समुद्राची पातळी दर शतकाला सुमारे 6.5 फूटांनी वाढत होती. आरहूसच्या नजीक हाजबर्जमध्ये मोए एस्ट्रूप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे 430 चौरस फुट क्षेत्रात उत्खनन केले आहे. वाढत्या सागरीपातळीने इतिहासाला टाइम कॅप्सूलप्रमाणे संरक्षित केले आहे. पाणबुड्यांना तेथे प्राण्यांची हाडं, दगडी अवजार, तीर, एका सीलचा दात आणि लाकडाचा तुकडा मिळाला आहे. पुढील उत्खननात हारपून मासेमारीची अवजारे मिळतील, अशी अपेक्षा पथकाला आहे.









