‘हॉप शूट्स’ ही जगातील सर्वात महागडी भाजी मानली जाते. तिची किंमत साधारणतः 85 हजार रुपये प्रतिकिलो इतकी आहे. युरोपमध्ये उगवणारी ही भाजी आता एका भारतीय शेतकऱयाचा जीवनाधार बनली आहे. ही औषधी भाजी असून अनेक गंभीर आजारांवर औषध म्हणून तिचा वापर केला जातो. त्यामुळेच तिला प्रचंड मागणी आहे. आणि म्हणूनच तिची किंमत इतकी अधिक आहे.
औरंगाबादमधील अमरेश कुमार यांनी आता या भाजीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग भारतात केला आहे. साधारणतः पाच एकरवर त्यांनी ‘हॉप शूट्स’ची लागवड केली असून हिमाचल प्रदेशमधून त्यांनी रोपे आणली होती. चार महिन्यांपूर्वी त्यांनी तिची लागवड केल्यानंतर आता ती भाजी हळूहळू बाळसे धरू लागली आहे. अमरेश कुमार यांच्या महत्त्वाकांक्षाही त्याबरोबर वाढू लागल्या आहेत. ही भाजी औषधी असल्यामुळे तिचा नेहमीच्या आहारात समावेश होत नाही. तथापि, अनेक जंतूसंहारक औषधांमध्ये या वनस्पतीच्या अर्काचा उपयोग केला जातो. क्षयरोगासारख्या दुर्धर रोगांवर हा रामबाण उपाय मानला जातो. इतकेच नव्हे तर या भाजीच्या फुलांचा उपयोग बियर तयार करण्यासाठी होतो. या फुलांना ‘हॉप कोन्स’ असे म्हणतात. डहाळय़ांचा उपयोग काही प्रमाणात खाण्यासाठीही केला जातो. तसेच या भाजीचे लोणचेही बनते. जे जगातील सर्वात महाग लोणचे आहे. या भाजीची सर्वाधिक आयात अमेरिकेकडून केली जाते. त्यामुळे भारतात या भाजीचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतल्यास भारतीय औषधनिर्मिती व्यवसायाला तर मदत होईलच शिवाय या भाजीची निर्यात क्षमताही अमाप आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.









