मेलबोर्न :
85 वर्षे जुनी वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियन असोसिएट प्रेस (एएपी) जून महिन्यापासून बंद होणार आहे. एएपीने मंगळवारी यासंबंधी घोषणा केली आहे. मोफत ऑनलाईन मजकूर वाढल्याने व्यवसायात लाभ होत नसल्याचा युक्तिवाद वृत्तसंस्थेने केला आहे. वृत्तसंस्था बंद पडल्यावर सुमारे 180 जणांना रोजगार गमवावा लागणार आहे.
एएपी बंद करण्याचा निर्णय अत्यंत अवघड ठरला आहे. एएपीची न्यूजवायर सर्व्हिस 1935 पासून क्षेत्रीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे, प्रसारक आणि डिजिटल संपादकांना लेख तसेच वृत्तसामग्री उपलब्ध करत आहे. एएपी 26 जून रोजी स्वतःची अंतिम सेवा पुरविणार असल्याची माहिती वृत्तसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रूस डेव्हिडसन यांनी दिली आहे. कीथ मर्डोक यांनी 1935 मध्ये एएपीची स्थापना केली होती.
दुःखद दिवस, एएपी पत्रकारितेतील 85 वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर बंद होणार आहे. या परिवाराची सदैव आठवण येत राहणार असे वृत्तसंस्थेचे संपादक गिलीस यांनी ट्विट करत म्हटले आहे. न्यूजवायर कंपनी बंद पडल्याने प्रसारमाध्यमांमधील वैविध्याला फटका बसणार आहे. एएपीचा कर्मचारीवर्ग सर्वात विनम्र असल्याचे म्हणत गिलीस यांनी त्यांच्याजवळ पत्रकारितेशिवाय दुसरे काहीच नसल्याचे उद्गार काढले आहेत.









