बायडेन रुग्णालयात दाखल – अध्यक्षीय अधिकार मिळविणाऱया पहिल्या महिला
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस शुक्रवारी सुमारे 1 तास 26 मिनिटांसाठी अमेरिकेच्या अध्यक्ष ठरल्या होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी पहिली नियमित ‘कोलोनस्कॉपी’ तपासणी करविण्यासाठी वाल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटरमध्ये गेले होते. काही काळासाठी त्यांनी सत्तेची सूत्रे कमला हॅरिस यांच्याकडे सोपविली होती.
कोलोनस्कॉपीदरम्यान बायडेन ‘ऍनेस्थीशिया’च्या प्रभावात राहणार असल्याने त्यांनी अल्पकाळासाठी हॅरिस यांना सत्तेची सूत्रे सोपविली होती. हॅरिस पहिल्यांदाच एक तासाहून अधिक काळ अध्यक्षपदी राहिल्या होत्या. बायडेन यांनी स्थानिक प्रमाणवेळेनुसार 11 वाजून 35 मिनिटांनी हॅरिस आणि व्हाइट हाउसचे चीफ ऑफ स्टाफ रोन क्लॅन यांच्याशी चर्चा केल्यावर हे पाऊल उचलले होते.
बायडेन पूर्णपणे तंदुरुस्त
बायडेन यांनी (78 वर्षे) डिसेंबर 2019 मध्ये स्वतःच्या शरीराची पूर्ण तपासणी करविली होती. तेव्हा डॉक्टरांनी बायडेन हे तंदुरुस्त असल्याचे आणि अध्यक्षपदाची जबाबदारी पेलण्यास सक्षम असल्याचे म्हटले होते.
कमला हॅरिससोबत मतभेद?
अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनुसार बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. बायडेन यांनी हॅरिस यांना अत्यंत संवेदनशील आणि हाताळण्यास अत्यंत अवघड कामे सोपविली होती. यात शरणार्थी आणि मताधिकाराचा मुद्दा सामील होता. या मुद्दय़ांमुळे हॅरिस यांच्या लोकप्रियतेचा आलेख खाली येऊ लागला आहे. मागील आठवडय़ातच एका सर्वेक्षणात हॅरिस यांचे अप्रूव्हल रेटिंग कमी होत केवळ 28 टक्के बायडेन यांचे 38 टक्के राहिले आहे. हॅरिस यांना आता व्हाइट हाउसच्या बाहेर काढण्याची तयारी होत असल्याचाही दावा केला जातोय.









