एलआयसीचे मूल्य सर्वाधिक वाढले : टीसीएस, आयटीसीचे मूल्य घसरले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेअर बाजारातील आघाडीवरच्या दहापैकी पाच कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य मागील आठवड्यामध्ये 85582.21 कोटी रुपयांनी वाढले होते. यामध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) यांचे बाजारमूल्य सर्वाधिक वाढल्याचे पहायला मिळाले.
मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 299 अंकांनी वधारला होता. 30 समभागांचा सेन्सेक्स 77145 या सर्वोच्च पातळीवर 13 जून रोजी पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी यांच्या बाजारमूल्यात मागच्या आठवड्यामध्ये वाढ झाली आहे. तर दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी यांच्या बाजारमुल्यात मात्र घसरण झाली आहे.
बाजारमूल्य किती वाढले
एलआयसीचे बाजारमूल्य 46425 कोटीनी वाढत 6,74,877 कोटी रुपयांवर तर एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य 18639 कोटींनी वाढत 12,14,965 कोटी रुपयांवर पोहोचले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुल्यामध्ये 10216 कोटी रुपयांची, एसबीआयमध्ये 9192 कोटींची तर भारती एअरटेलच्या मुल्यामध्ये 1108 कोटींची भर पडली होती. एचयूएलच्या बाजारमुल्यात 22885 कोटींची घसरण दिसून आली. या योगे कंपनीचे बाजारभांडवल मूल्य 5,82,522 कोटी रुपयांवर राहिले होते.
निफ्टीने रचला इतिहास
निफ्टी निर्देशांकाने शुक्रवारी 23,490 ची सर्वोच्च पातळी गाठली होती. शेवटी 66 अंकांनी घसरत 23,465 अंकांवर निफ्टी बंद झाला तर सेन्सेक्स 181 अंकांनी वधारत 76,992 अंकांवर बंद झाला होता.
मिडकॅप-स्मॉलकॅप सर्वोच्च स्तरावर
बीएसईवर मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांनीही मागच्या आठवड्यात सर्वोच्च स्तर गाठण्यात यश मिळवलं होतं. मिडकॅप निर्देशांकाने 46,088 ची सर्वोच्च तर स्मॉलकॅप निर्देशांकाने 51,259 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती.









