केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाची शुक्रवारी बैठक झाली असून यात अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. देशात 85 नवी केंद्रीय आणि 28 नवी नवोदय विद्यालये सुरू केली जाणार आहेत. नवोदय विद्यालय योजनेच्या अंतर्गत न व्यापण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये ही विद्यालये सुरू केली जातील. याचबरोबर हरियाणाशी संपर्कव्यवस्था वाढविण्यासाठी दिल्ली मेट्रोच्या 26.46 किलोमीटर लांबीच्या रिठाला-कुंडली कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
नवे शिक्षण धोरण लागू करण्यासाठी पीएम श्री आणले गेले होते. सर्व केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांना पीएम श्री शाळांच्या स्वरुपात निवडले गेले आहे. नवी केंद्रीय विद्यालये सुरु होणार असल्याने देशभरात 82 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तायुक्त शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. वर्तमानात 1256 कार्यात्मक केंद्रीय विद्यालये आहेत. यातील 3 विदेशात आहेत. यात मॉस्को, काठमांडू आणि तेहरान येथील विद्यालय सामील आहे. 13.56 लाख विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याचे वैष्णव यांनी सांगितले आहे.









