अम्मासाठी तयार करणार घर अन् रेस्टॉरंट
कोईम्बतूरमध्ये इडलीवाल्या अम्मा या नावाने प्रसिद्ध 85 वर्षीय वृद्ध महिला मागील 30 वर्षांपासून एक रुपयात इडली विकत आहे. दोन वर्षांपूर्वी इडली अम्मा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. त्यावेळी सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांनीही त्यांची चित्रफित शेअर केली होती. इडली अम्माच्या या कामात योगदान करू इच्छित असल्याचे त्यांनी म्हटले होते. स्वतःच्या परोपकारासाठी प्रसिद्ध आनंद महिंद्रा यांनी चुलीवर इडली तयार करणाऱया अम्मांसाठी एलपीजी गॅस स्टोव्हची व्यवस्था केली होती.
पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी इडली अम्माला मदत करणार असल्याचे सांगितले आहे. लवकरच अम्माकडे स्वतःचे घर आणि रेस्टॉरंट असेल, जेथे त्या इडली तयार करून विकू शकतील असे महिंद्रा यांनी म्हटले आहे. महिंद्रा यांनी इडली अम्मासाठी एक भूखंड खरेदी केला आहे. अम्मा यांच्याशी सल्लामसलत करुन त्यांच्या गरजेनुसार घराची निर्मिती सुरू केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे. या वृद्ध महिलेचे नाव कमलाथल असून त्या एक रुपयात लोकांना इडलीचटणी खाऊ घालतात. त्या निस्वार्थ भावनेने इतक्य कमी रकमेत लोकांचे पोट भरत आहेत.