वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को :
कॅलिफोर्नियाच्या जंगलांमध्ये पुन्हा वणवा पेटला आहे. मागील 72 तासांमध्ये कॅलिफोर्नियात 11 हजारवेळा वीज कोसळल्याने सुमारे 367 ठिकाणी आग लागली आहे. यातील 23 ठिकाणी आगीचे संकट भीषण असल्याची माहिती गव्हर्नर गॅविन न्यूसन यांनी दिली आहे. अग्निशमन विभाग वणवा विझविण्यासाठी कार्यरत आहे. आगीचे संकट पाहता गव्हर्नरांनी आणीबाणी घोषित केली आहे. आग विझविण्यासाठी कार्यरत असलेले एक हेलिकॉप्टर बुधवारी दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत वैमानिक आणि एका कंत्राटदाराचा मृत्यू झाला आहे.
उत्तर कॅलिफोर्नियातील वॅकाविले या भागात आगीचे संकट तीव्र आहे. तेथील 50 हून अधिक घरे जळून खाक झाली आहेत. हजारो लोकांना स्वतःचे घर सोडावे लागले आहे. महामार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली आहे. सॅन फ्रान्सिस्को शहरात धूर फैलावल्यावर लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अमेरिकेच्या अन्य प्रांतांच्या तुलनेत कॅलिफोर्निया उष्ण आहे. याच कारणामुळे उन्हाळय़ात तेथील जंगलांमध्ये वणवा पेटत असतो. पावसाळा सुरू होईपर्यंत वणव्यांचे सत्र सुरू राहते. परंतु मागील काही वर्षांमध्ये आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. कॅलिफोर्नियाच्या जंगलांनजीक नागरी वस्ती वाढली असल्याने आग लागल्यावर नुकसान अधिक होऊ लागले आहे. याच कारणामुळे आग लागण्याचा धोका अधिक असलेल्या काही भागांची ओळख अग्निशमन दलाने पटविली आहे.
मागील वर्षी मोठे संकट
अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलांमध्ये मागील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये 85 वर्षांमधील सर्वात भीषण वणवा पेटला होता. या वणव्यात 31 पेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. तर शेकडो जण बेपत्ता झाले होते. 1933 मध्ये लॉस एंजिलिसच्या ग्रिफिथ पार्कमध्ये लागलेल्या आगीनंतर कॅलिफोर्नियाच्या जंगलातील ही सर्वात मोठी आग होती. सुमारे 83 हजार एकर भागात आग पसरली होती. तर 3 लाख लोकांना स्वतःचे घर सोडून अन्यत्र धाव घ्यावी लागली होती.









