ब्राझीलच्या दांपत्याच्या नावावर विश्वविक्रम
ब्राझीलमध्ये एक असे दांपत्य आहे, ज्याच्या विवाहाला 84 वर्षे आणि 77 दिवस पूर्ण झाले आहेत. मनोएल एंजेलिम डिनो आणि मारिया डी सूसा डिनो यांच्या नावावर अनोखा विश्वविक्रम नोंदविला गेला आहे. हे दांपत्य सर्वाधिक काळ जिवंत राहणारे जोडपे ठरले आहेत. या दोघांची प्रेमकहाणी 1836 साली सुरू झाली होती. 1936 मध्ये दोघांची पहिली भेट झाली होती आणि मग 1940 मध्ये त्यांनी ब्राझीलच्या सेरामधील एका चॅपलमध्ये विवाह केला होता. तेव्हापासून आतापर्यंत दोघांनी एक सुंदर जीवन व्यतित केले आहे. या दोघांनाही 13 अपत्य असून सद्यकाळात त्यांचा एक अत्यंत विशाल परिवार आहे. त्यांच्या परिवारात 55 नातवंड सामील आहेत. या ब्राझीलच्या जोडप्यापूर्वी सर्वाधिक काळ एकत्र राहणारे जोडपे कॅनडातील डेव्हिड जॅकब हिलर आणि सारा डेवी हिलर हेते.
लॉन्गेवीक्वेस्ट ही संघटना 100 वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या लोकांच्या जीवनावर नजर ठेवून असते. या संघटनेने इन्स्टाग्रामवर ब्राझीलच्या या जोडप्याची प्रेरणादायी कहाणी शेअर केली होती. मनोएलचे प्रथम नजरेतच मारियावर प्रेम जडले होते. मारियाच्या कुटुंबीयांनी प्रारंभी मनोएलसोबतच्या नात्याला विरोध दर्शविला होता. परंतु मारियासोबत आयुष्य घालविण्यासाठी दृढसंकल्पित मनोएलने मारियासाठी एक घर निर्माण करण्याचा निर्णय घेतला. मग मारियाच्या कुटुंबीयांनी देखील विवाहाला होकार दर्शविला होता. दोघांच्या विवाहाला 84 वर्षे झाली आहेत, परंतु आजही दोघेही परस्परांवर भरपूर प्रेम करत असतात. मनोएल 100 वर्षांचे झाले असल्याने ते बहुतांश काळ आराम करत असतात. परंतु दररोज संध्याकाळी ते मारिया यांच्यासोबत रेडिओवर रोजरी प्रार्थना ऐकणे चुकवत नाहीत.









