9 लाख 80 हजार लाभार्थ्यांची अर्ज स्वीकृती : उर्वरितांसाठी काम सुरू
बेळगाव : सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. शक्ती, गृहज्योती, अन्नभाग्य, पाठोपाठ गृहलक्ष्मी योजनेची नोंदणीही सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 9 लाख 80 हजार 722 लाभार्थ्यांनी नोंद केली आहे. या योजनेला लाभार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून 82 टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित नोंदणीचे कामदेखील सद्यस्थितीत सुरू आहे. काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. त्यापैकी महिलांसाठी महत्त्वाकांक्षी असणाऱ्या गृहलक्ष्मी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. ग्रामवन, कर्नाटक वन, बेळगाव वन, बापूजी सेवा केंद्र आदी ठिकाणी अर्ज स्वीकृती सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 11 लाख 87 हजार 469 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत 9 लाख 80 हजार 722 लाभार्थ्यांनी नोंद केली आहे. अद्यापही दीड लाखाहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी शिल्लक आहे. शिवाय उर्वरितासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
सुरुवातीच्या काळात अर्ज नोंदणीसाठी महिलांची झुंबड उडाली होती. त्यामुळे महिलांना दिवस दिवसभर ताटकळत थांबावे लागले होते. मात्र आता केंद्रांवर गर्दी ओसरू लागली आहे. त्यामुळे प्रक्रियेचे कामदेखील सुरळीत होऊ लागले आहे. काही लाभार्थ्यांची कागदपत्रे अर्धवट असल्याने नोंदणी प्रक्रिया होऊ शकली नाही. मात्र आता सुरळीत कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर काम पूर्ण होऊ लागले आहे. काही लाभार्थ्यांच्या रेशनकार्डवर पुरुष लाभार्थी कुटुंब प्रमुख असल्याचे दिसून येत आहे. अशा लाभार्थ्यांना प्रथमत: रेशनकार्ड अपडेट करून घ्यावे लागत आहे. त्यानंतर गृहलक्ष्मीसाठी अर्ज करावा लागत आहे. त्यामुळे रेशनकार्ड अपडेट आणि अर्ज नेंदणी प्रक्रियाही सुरू आहे.
नेंदणी प्रक्रियेला महिलांचा उदंड प्रतिसाद
जिल्ह्यातील 11 लाख लाभार्थ्यांपैकी 9 लाख लाभार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज नेंदणी केली आहे. नोंदणी प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्ण झाली असून 82 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांसाठी अर्ज स्वीकृती सुरू आहे. अर्ज नेंदणी प्रक्रियेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
– नागराज आर. (महिला व बालकल्याण खाते सहसंचालक)









