केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद
रेल्वे प्रकल्पांसाठी राज्याला 13 हजार कोटी
चिपळूण प्रतिनिधी
राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी एकूण 13 हजार 539 कोटी रुपयांची तरतूद 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली असून यापैकी 10 हजार 600 कोटी रुपये मध्यरेल्वेच्या वाट्याला आले आहेत. यामध्ये लोटे येथे साकारत असलेल्या रेल्वेच्या कारखान्यासाठी 82 कोटीची तरतूद वगळता उर्वरित कोकणातील रेल्वेमार्गाकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला पूर्णत: नव्या मार्गिकांच्या कामांसाठी एकूण 1 हजार 685 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून सर्वाधिक 600 कोटी रुपयांची तरतूद वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ पुसद या 270 किलोमीटर मार्गिकेसाठी आहे. तर अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ मार्गिकेसाठीही 250 कोटी, सोलापूर-उस्मानाबाद-तुळजापूर मार्गासाठी 110 कोटी आणि धुळे-नर्दाना मार्गिका, कल्याण-मुरबाड व्हाया उल्हासनगर व बारामती-लोणांद मार्गासाठी प्रत्येकी 100 कोटी तर फलटण-पंढरपूर या 105 किलोमीटर मार्गिकेच्या बांधकामासाठीही 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या अतिरिक्त मार्गिकांच्या कामांसाठी एकूण 2 हजार 702 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. मात्र यामध्ये कोकणातील वैभववाडी-कोल्हापूर, चिपळूण-कराडसह अन्य रेल्वेमार्गाकडे पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्पात दुर्लक्ष करण्यात आले आहे.
कोकण रेल्वेचा कायापालट करणारे तत्कालीन रेल्वेमंत्री, कोकणचे सुपूत्र सुरेश प्रभू यांच्या दूरदृष्टीतून खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीच्या विस्तारित टप्प्यातील असगणीच्या माळरानावर आकार घेत असलेल्या रेल्वेच्या रोलिंग स्टाॅक कंपोनंट प्रकल्पाला मात्र या अर्थसंकल्पात 82 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सुमारे 450 कोटी रूपये गुंतवणुकीचा आणि कोकणच्या प्रगतीत महत्वाचे योगदान देणारा हा प्रकल्प कोकणातील एकमेव व मोठा सरकारी प्रकल्प आहे. सध्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या वर्षात येथून प्रत्यक्षात उत्पादनाला सुरूवात होईल, अशी शक्यता आहे.









