देशात 50 नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडणार : 40 महाविद्यालयांची मान्यता रद्द
सध्या भारतात मेडिकलच्या जागा 1,07,658, देशातील एकूण वैद्यकीय महाविद्यालये 702
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात यावषी 50 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून देण्यात आली. या महाविद्यालयांमध्ये 30 शासकीय तर 20 खासगी महाविद्यालये असतील. ही महाविद्यालये सुरू झाल्यानंतर देशातील यूजी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जागांची संख्या वाढणार आहे. भारतात मेडिकलच्या सध्या 1 लाख 7 हजार 658 जागा असून त्यात आणखी 8 हजार 195 जागांची वाढ होणार आहे. सध्या भारतात 702 वैद्यकीय महाविद्यालये आहेत.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) यंदा 40 महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे. ‘एनएमसी’चे युजी बोर्ड पाच वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देत आहे. या कारवाईनंतर आतापर्यंत 20 वैद्यकीय महाविद्यालयांचे अपील वैद्यकीय मंडळाकडे गेले आहे. तर 6 अपील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे आली आहेत. ‘एनएमसी’समोर अपील केल्यानंतर दुसरे अपील आरोग्य मंत्रालयाकडे येते. त्याचवेळी वैद्यकीय आयोगाने 9 वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागा कमी करण्याचे आदेशही दिले आहेत. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा तुटवडा जाणवल्यानंतर जागांचा आकडा कमी केला जात आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबत सरकार मिशन मोडमध्ये
दुसरीकडे, मोतीबिंदूच्या अनुशेष शस्त्रक्रियेबाबत सरकार मिशन मोडमध्ये काम करत असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. यावषी जानेवारीपासून आतापर्यंत 83 लाख शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दरवषी 60 ते 65 लाख मोतीबिंदू ऑपरेशन्स होतात. गेल्या दोन-तीन वर्षात कोविडमुळे बऱ्याच शस्त्रक्रिया प्रलंबित होत्या. त्यामुळे दोन वर्षांपासून मोतीबिंदूच्या रखडलेल्या शस्त्रक्रिया वाढवण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. यंदा 17 ते 31 जानेवारी या कालावधीत मोहीम राबवून 75 लाख शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही हे सत्र कायम असून आतापर्यंत सुमारे 83 लाख 44 हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.