कर्जमाफी योजना : पहिल्या दोन टप्प्यांतील याद्यांमधील शेतकऱयांच्या खात्यात रक्कम जमा
प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 8 हजार 77 शेतकऱयांच्या बँक खात्यात 32 कोटी 69 लाख रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
सप्टेंबर ते ऑक्टोबर 2019 मध्ये झालेले क्यार व महाचक्रीवादळ तसेच अवकाळी पाऊस यामुळे भातशेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱयांसाठी शेती कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेसाठी याद्या तयार करण्यात येऊन याद्यांचे जस-जसे आधार प्रमाणिकरण होते, त्याप्रमाणे याद्या प्रसिद्ध करून कर्जमाफीची रक्कम शेतकऱयांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात एकूण 11 हजार 78 शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत. त्यांची यादी प्रमाणिकरण करून कर्जमुक्ती टप्प्याटप्प्याने दिली जात आहे. 11 हजार 78 शेतकऱयांची सुमारे 50 कोटीपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा होणे अपेक्षित आहे.
राज्य सरकारने कर्जमुक्ती योजनेत पहिल्या व दुसऱया टप्प्यातील यादी जाहीर केली आहे. या दोन्ही याद्यांमध्ये एकूण 8 हजार 859 शेतकऱयांचा समावेश आहे. त्यापैकी 8 हजार 528 शेतकऱयांचे आधार प्रमाणिकरण झाले असून अद्याप 331 शेतकरी शिल्लक आहेत. आधार प्रमाणिकरण झालेल्या 8 हजार 528 शेतकऱयांपैकी 8 हजार 77 शेतकऱयांच्या बँक खात्यात 32 कोटी 69 लाख रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. उर्वरित 451 शेतकऱयांच्या बँक खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे. एकूण 11 हजार 78 शेतकऱयांपैकी यादी प्रसिद्ध करायची शिल्लक असणाऱयांना तिसरी व चौथी यादी प्रसिद्ध झाल्यावर कर्जमुक्ती रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. अजूनही 2 हजार 219 शेतकरी तिसऱया व चौथ्या टप्प्यातील याद्या प्रसिद्ध होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.









