40 वर्षीय पुत्राचा मात्र लढा सुरूच
वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा
माणसाच्या अंगी प्रचंड आत्मविश्वास असेल तर विजय प्राप्त मिळणे कठीण नाही. नोएडामधील सेक्टर-22 मध्ये राहणाऱया 80 वर्षीय महिलेने कोरोनाला पराभूत करत अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. सदर महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, अद्याप त्यांचा 40 वर्षीय मुलगा कोरोनाशी लढा देत असल्याची माहिती वैद्यकीय तज्ञांनी दिली.
नोएडामधील सेक्टर-22 मध्ये राहणाऱया आई आणि मुलाला 10 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केलेल्या महिलेला रक्तदाबासह हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यांच्या स्वॅबची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. याबाबत अधिक तपासणीकरीता वैद्यकीय अधिक्षक आशुतोष रंजन यांच्या नेतृत्वाखाली विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती.
या समितीने कोरोनाबाधित वृद्ध महिलेच्या वैद्यकीय अहवालावर लक्ष ठेवले होते. त्याचबरोबर हृदयविकारासंबंधी उपचारासाठी डॉ. शुभेंदू मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली. अखेर शुक्रवारी सदर महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला.









