जिल्हय़ात 5,901 घरांची पडझड, 20 घरे जमीनदोस्त : महावितरणचेच 40 कोटीचे नुकसान : पालकमंत्र्यांनी दिली माहिती
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पद भरतीचा शासन आदेश जारी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे 80 टक्के पंचनामे झाले आहेत. 5 हजार 901 घरांची पडझड, तर 20 घरे पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत. त्याशिवाय शेती, शाळा व महावितरणचे मिळून 72 कोटीचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 21 रोजी नुकसानीची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्गात येत असून मुख्यमंत्रीच नुकसान भरपाई किती देणार, हे जाहीर करणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे 100 कोटीच्या आयुष रिसर्च सेंटरला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पद भरतीचा शासन आदेश जारी झाल्याचीही माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
ऑनलाईन पत्रकार परिषदेला आमदार वैभव नाईक उपस्थित होते. पालकमंत्री सामंत म्हणाले, आपण चक्रीवादळ नुकसानीचा पाहणी दौरा करून आढावा घेतला असता नुकसानीचे आतापर्यंत 80 टक्के पंचनामे झाले आहेत. त्यामध्ये 5 हजार 901 घरांची पडझड व 20 घरे पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत. त्यांचे 10 कोटीचे नुकसान झाले आहे. मच्छीमारांचे दोन कोटी, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य केंदे इमारतींचे 10 कोटी, शेतीचे 10 कोटी, महावितरणचे 40 कोटी मिळून 72 कोटीचे नुकसान झाले आहे. यात अजूनही वाढ होण्याची शक्मयता आहे तसेच तिघांचा मृत्यू झाला असून एक बेपत्ता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 21 रोजी सिंधुदुर्ग जिल्हय़ात येत असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकऱयांना देण्यात आले आहेत. निसर्ग चक्रीवादळच्या धर्तीवरच जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असून जिल्हा दौऱयानंतर मुख्यमंत्रीच भरपाई देण्याचे जाहीर करणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच तोपर्यंत केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे भरपाई देणे सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱयांना दिल्याचेही ते म्हणाले.
100 कोटीच्या आयुष रिसर्च सेंटरला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
दोडामार्ग येथील आडाळी येथे 100 कोटीच्या आयुष रिसर्च सेंटरला बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. 50 एकर क्षेत्रात हा प्रकल्प होणार असून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी रिसर्च सेंटरचा प्रस्ताव ठेवला होता. तर खासदार विनायक राऊत व तत्कालिन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी ते होण्यासाठी प्रयत्न केले होते. या आयुष रिसर्च सेंटरमुळे आरोग्य सुविधांबरोबरच त्या भागात रोजगार मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानंतर आयुष्य रिसर्च सेंटर मंजूर करण्याचाही शब्द पूर्ण केला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पद भरतीचा शासन अध्यादेश
सिंधुदुर्ग जिल्हय़ात शासकीय महाविद्यालयात सुरू करण्यास मंजुरी दिली गेल्यानंतर 968 कोटीची आर्थिक तरतूद करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता पद भरतीसाठी मान्यता देऊन पद भरतीचा शासन अध्यादेश निघाला आहे. तसेच इन्स्ट्रूमेन्टसाठी 2 कोटी 98 लाख, फर्निचरसाठी 1 कोटी 58 लाख मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्राचार्य डॉ. मोरे यांची नेमणूक झाली असून लवकरच प्राध्यापक नियुक्ती करणार असल्याचेही ते म्हणाले.
राजकारण करण्याची ही वेळ नाही, लोकांना मदत करा!
आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पालकमंत्री सामंत म्हणाले, कोरोना आणि आता चक्रीवादळाचे संकट आहे. अशा स्थितीत टीका करण्याची ही वेळ नाही आणि त्याच्या टीकेला उत्तर देण्यास आपण बंधनकारक नाही, असे ते म्हणाले. आमदार राणेंनी टीका करीत बसण्यापेक्षा लोकांना मदत करावी. शिवसेनेमार्फत कौलांचे दहा ट्रक मागविण्यात आले आहेत. सिमेंट पत्रेही मागविले आहेत आणि प्रत्यक्षात काम सुरू केले आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.









