सरकारी जागा मिळण्यासाठी लाभार्थ्यांची आकडेवारी उपलब्ध
बेळगाव : राज्यामध्ये ग्रामीण भागात अनेक कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित आहेत. एका बेळगाव जिल्ह्यात 80,832 कुटुंबांना स्वत:चे घर नाही. सरकारी जागा मिळण्यासाठी कोण पात्र आहेत, कोण नाहीत याची आकडेवारी एका खात्रीदायक सूत्राकडून उपलब्ध झाली आहे. याची पडताळणी करण्यासाठी सरकारने जिल्हा पंचायतमार्फत निवासी सर्वेक्षण सुरू केले असून सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील ग्रामीण भागात 13,64,842 कुटुंबे हक्कांच्या घरांपासून व जागेपासूनही वंचित आहेत. बहुतांशी जिल्हा पंचायतीनी 2024-25मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती सामोरी आली आहे. यापूर्वी 1918 मध्ये राज्यभरात शहर, निमशहर व ग्रामीण भागात निवास आणि स्वत:ची जागा नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर आता 2024-25 मध्ये पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. फोटोसह जीपीएस सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये भिक्षुक, भटकी जमात, भूमीहिन, भावातील भांडणांमुळे वेगळी झालेली कुटुंबे हे सारेजण लहानशा घरामध्ये वास्तव्यास आहेत. या सर्वांचे सर्वेक्षण करून सरकारला अहवाल देण्यात आला आहे.
2024-25 मधील सर्वेक्षणानंतर उपेक्षित कुटुंबांना हक्काचे घर मिळणार का?
ग्रामीण भागात झोपडीमध्ये, रस्त्यावर किंवा गल्ल्लीच्या कोपऱ्यावर तंबू ठोकून अनेक कुटुंबे रहात आहेत. मात्र या कुटुंबाबद्दल निश्चित माहिती सरकारला उपलब्ध नसल्याने ही कुटुंबे अद्याप उपेक्षितच आहेत. आता 2024-25 मध्ये होणाऱ्या सर्वेक्षणानंतर ग्रामीण भागासह उपेक्षित कुटुंबांना हक्काचे घर मिळणार का? याचे उत्तर येत्या काही दिवसातच मिळणार आहे. स्वत:चे घर मिळविण्यासाठी सर्वाधिक मागणी मंड्या जिल्ह्यातून आहे. येथून 1,38,144 कुटुंबे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर तुमकूर (111560), रायचूर (106032), बिदर (92812), बेळगाव (80832).
उडुपीतून सर्वात कमी मागणी
हक्काचे घर मिळण्यासाठी उडुपी जिल्ह्यातून सर्वाधिक कमी मागणी झालेली आहे. या जिल्ह्यातून 4,638 कुटुंबे हक्काच्या घरासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर मंगळूर 7,660, शिमोगा 15,914, कारवार 17,248, चिक्कमंगळूर 21,969.
यांना मिळणार हक्काचे घर
- कुटुंब बीपीएल कार्डधारक असावेत.
- कुटुंबांने यापूर्वी सरकारी निवासी योजनेंतर्गत घर मिळविलेले नसावे
- एका घरामध्ये दोन ते तीन कुटुंबे वास्तव्यास असल्यास त्यापैकी एका कुटुंबाला हक्काचा घराचा लाभ मिळणार आहे.









