शाळांच्या विद्यार्थिनी : रुग्णालयात दाखल
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानच्या उत्तर भागात दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये प्राथमिक शाळांच्या 80 विद्यार्थिनींवर विषप्रयोग करण्यात आला आहे. या सर्व विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यापासून अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे.
तालिबानने यापूर्वी मुलींना सहावीपर्यंतचे शिक्षण घेण्याची अनुमती दिली आहे. अफगाणिस्तानातील सर-ए-पुल प्रांतातील विद्यार्थिनींवर विषप्रयोग झाला आहे. संबंधित दोन्ही शाळा एकाच परिसरातील असल्याचे समजते.
याप्रकरणाचा आम्ही तपास करत आहेत. मुलींना विष कशातून देण्यात आले हे अद्याप समजलेले नाही. प्रारंभिक तपासात हा कटाचा भाग असल्याचे वाटतेय. विषप्रयोगामुळे पीडित सर्व विद्यार्थिनी इयत्ता सहावीत शिकत होत्या अशी माहिती सर-ए-पुलच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
अफगाणिस्तानात 2015 मध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. तेव्हा हेरात प्रांतात शाळेतील 600 मुलींवर विषप्रयोग झाला होता. तेव्हा कुठल्याच संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली नव्हती. परंतु त्यावेळी अनेक मानवाधिकार संघटनांनी तालिबानला या घटनेसाठी जबाबदार धरले होते.
तालिबान राजवटीने 4 दिवसांपूर्वीच जगातील अनेक देशांकडे स्वत:ला मान्यता मिळावी म्हणून साकडे घातले आहे. याचकरता कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन थानी हे 12 मे रोजी कंधारच्या दौऱ्यावर होते. थानी यांनी अफगाण तालिबानचे सर्वोच्च नेते हेबतुल्लाह अखुंदजादाची कंधारमध्ये भेट घेतली होती. तालिबानी राजवटीला जागतिक मान्यता हवी असल्यास महिलांना त्यांचे अधिकार प्रदान करावे लागतील असे थानी यांनी स्पष्ट केले होते. याचवरून दोघांमधील चर्चा फिस्कटली होती.