कोल्हापूर / विनोद सावंत :
स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जीवरक्षक–पाणबुडी उदय निंबाळकर यांनी आतापर्यंत नदी, तलाव, विहिर, खणीमधील 117 हून अधिक मृतदेह बाहेर काढले आहेत. पाण्यात बुडणाऱ्या 80 जणांचा जीव वाचविण्याचे कामही त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे 27 वर्षापासून कोणताही मोबदला न घेता ते सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करत आहेत.
शुक्रवार पेठेतील पंचगंगा तालीम मंडळ परिसरातील 60 वयाचे असणारे उदय बाळकृष्ण निंबाळकर 27 वर्ष जीवरक्षक म्हणून काम करत आहेत. वयाच्या 10 व्या वर्षापासून ते पंचगंगा नदीमध्ये पोहायला जातात. ज्यावेळी पैसे कमवत नव्हते त्यावेळेला भाविक नदीमध्ये पैसे टाकत असत. ते नदीच्या पाण्यात खोल शिरुन काढत होते. 26 जानेवारी 1997 रोजी ते रंकाळा तलावावर सकाळी फिरायला गेले असता त्या ठिकाणी मोफत नौका विहार चालू होते. एक नौका रंकाळा तलावात पलटी झाली. तेव्हा निंबाळकर यांनी अंगावरच्या कपड्यासहित तलावात उडी घेवून दोन लहान मुलांना वाचवले. त्यावेळेला चार जण मृत्यू झाल. त्यानंतर 1998 मध्ये पंचगंगा नदीमध्ये बुडणाऱ्या 2 मुलांनाही त्यांनी वाचवले. मुंबईचा एक प्रवासी पंचगंगा नदीमध्ये बुडाला होता. तेव्हा निंबाळकर यांनी कधीही पाण्यातील मृतदेह बाहेर काढला नव्हता. माणूसकी या नात्याने त्यांनी बुडालेला मृतदेह शोधून काढला आणि त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्याचवर्षी पन्हाळा, वाघबीळमधील पाझर तलावात एका मुलाचा मृतदेह काढून दिला. तेव्हापासून निंबाळकर यांची ओळख जीवरक्षक–पाणबुडी अशी सर्वत्र झाली.
त्यांनी 27 वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे 117 मृतदेह खोल पाण्यातून शोधुन काढलेले आहेत. पेठ वडगांव, इचलकरंजी, कळे, गंगापूर. चिखली, वडणगे–पाडळी, गांधीनगर, चंदगड मधील कदनुर धरण, शाहुवाडी मलकापुर येथील विहीर, तलाव नदीमधूनही त्यांनी मृतदेह काढून संबंधीतांच्या ताब्यात दिलेले आहेत.
- निंबाळकरांमुळे खुन्यातील आरोपींचा शोध
निंबाळकर यांनी पाण्यातून केवळ मृतदेहच काढली नाहीत. तर खुन झाल्यानंतर आरोपी पुरावा नष्ट करण्यासाठी हत्यारे पाण्यामध्ये फेकतात. निंबाळकर यांनी अशी हत्यारेही काढून देवून पोलीसांच्या तपासात मोलाची मदत केली आहे.
- खोल पाण्यातील मोबाईल, चेन, मोटरही काढल्या
सेल्फी काढत असतांना रंकाळा तलावामध्ये, खणीमध्ये पाण्यामध्ये पडलेले मोबाईल निंबाळकर यांनी संबंधितांना काढून दिले आहेत. आतापर्यंत असे 20 ते 25 मोबाईल त्यांनी काढलेले आहेत. पाण्यामध्ये पडलेल्या पाणी उपसा करण्याच्या मोटारी 40 ते 50 काढल्या. त्यानतर सोन्याच्या चेना आतापर्यंत 6 काढलेल्या आहेत.अंगठी व कानातील रिंगा ही त्यांनी काढून दिल्या आहेत.
- 70 भाविकांचे प्राण वाचविले
भाविक–पर्यटक अंबाबाई मंदिर व जोतीबा दर्शनासाठी आल्यानंतर पंचगंगा नदीला स्नान करण्यासाठी येतात. यावेळी काहींना पाण्याचा अंदाज येत नाही. ते पाण्याच्या प्रवाहात बुडतात. आतापर्यत 70 भाविक व अन्य व्यक्ती असे 80 जणांना पाण्यात बुडत असतांना जीवरक्षक निंबाळकर यांनी वाचवले आहे.
- पोलिसांनी दिली रिक्षा
निंबाळकर दुसऱ्याची रिक्षा भाडेतत्वावर घेवून व्यवसाय करत होते. 2003 मध्ये एका खुन प्रकरणात वापरलेली हत्यारे केर्ली, केखले येथील विहिरीतून शोधून दिली. यामुळे आरोपी पकडला गेला. तत्कालिन करवीर ठाण्याचे पोलिस निरिक्षक जयवंत देशमुख यांनी याची दखल घेतली. जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमधील स्टाफकडून वर्गिणी काढून त्यांनी 82 हजार रूपये निंबाळकर यांना रिक्षा खरेदी करण्यासाठी दिले.
- निंबाळकर यांची कामगिरी
पाण्यातून काढलेले मृतदेह -117
बुडणाऱ्यांना वाचविले-80
पाण्यातून काढले मोबाईल -25
चेन-6
मोटरी-20
- निंबाळकरांना मदतीचा हात देण्याची गरज
मनपा अग्निशमन दल, पोलिसांना जे जमत नाही ते निंबाळकर करून दखवतता. आजपर्यत केलेल्या कामाची शासनाकडून त्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. 2019 मध्ये त्यांचे महापुरामध्ये घर पडले. सध्या ते भाडेतत्वावरील घरात राहतात. त्यांना तीन मुली आहेत. रिक्षा व्यवसाय करत असल्याने उत्पन्नास मर्यादा आहेत. त्यांना शासनाकडून घर बांधायला आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या कामाचा गौरव म्हणुन महिन्याला मानधनही सुरू करणे अपेक्षित आहे. कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पाठपुराव करणे गरजेचे आहे.








