बिल पाहून आईला बसला धक्का
अमेरिकेच्या केंटकी प्रांतातील लेक्सिंग्टन शहरातून एक अचंबित करणारी घटना समोर आली आहे. येथे एका घरी 30 डब्यांमध्ये सुमारे 70 हजार डम-डम लॉलिपॉप पोहोचल्यावर महिलेला धक्का बसला. हे सर्व तिच्या 8 वर्षीय मुलगा लियामने आईच्या फोनवरून ऑर्डर करत मागविले होते. या ऑर्डरची किंमत सुमारे 3.3 लाख रुपये होती.
लियाम अनेकदा स्वत:च्या आईच्या फोनवर गेम्स खेळायचा. यावेळी त्याला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा झाली. स्वत:च्या मित्रांसाठी एक कार्निव्हल ठेवण्याचा आणि त्यात लॉलिपॉप्स वाटण्याचा विचार त्याने केला. हीच इच्छा पूर्ण करण्याच्या नादात त्याने 30 बॉक्स लॉलिपॉप्सची ऑर्डर दिली. त्याची आई हॉलीने बँक खाते तपासले असता मोठे बिल पाहून तिला धक्काच बसला. लियामला फोएटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एफएएसडी) आहे, या स्थितीमुळे मुलांच्या विचार अन् समजून घेण्याची क्षमता प्रभावित होते. परंतु तो अनेकदा आईचा फोन वापरत होता, त्याने पहिल्यांदाच याद्वारे काहीतरी खरेदी केले आहे.
आईला मुलाने केलेल्या ऑर्डरची माहिती कळताच तिने त्वरित अमेझॉनशी संपर्क साधला. डिलिव्हरी करण्यास नकार दिल्यास पैसे परत मिळतील असे कंपनीकडून सांगण्यात आले. परंतु तोपर्यंत 22 डबे घरी पोहोचले देखील होते आणि डिलिव्हरी बॉयने दरवाजा ठोठावला नाही तसेच बेलही वाजविली नाही. अशास्थितीत हॉलीने फेसबुकवर मदत मागितली. लियामने 30 बॉक्स लॉलिपॉप मागविले आहेत आणि अमेझॉन ते परत घेण्यास नकार देत असल्याचे तिने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद पेले होते. मग शेजारी, मित्र, स्थानिक व्यवसाय आणि बँकांनी देखील पुढे येत मदत केली आणि लॉलिपॉप्सचे बॉक्स खरेदी केले.
तर माध्यमांमध्ये हे प्रकरण व्हायरल होताच अमेझॉनने पूर्ण रक्कम रिफंड केली आहे. शिल्लक लॉलिपॉप्सचा काही हिस्सा चर्च आणि शाळेत दान करण्यात आला. हॉलीने स्वत:च्या फोनचे सेटिंग्स बदलत पुन्हा अशी गोड दुर्घटना घडू नये यासाठी काळजी घेतली आहे.









