84 संशयितांना अटक ः शरमेने झुकली देशाची मान
वृत्तसंस्था/ केप टाउन
दक्षिण आफ्रिकेत 8 महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 80 हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलीस मिनिस्टरने (गृहमंत्री) या क्रूर गुन्हय़ाला ‘शेम ऑफ द नेशन’ ठरविले आहे. बंदुकधाऱयांच्या एका टोळीने मागील आठवडय़ात क्रूगर्सडॉर्प शहरात एका खाणीनजीक एका म्युझिक व्हिडिओ शूटवर हल्ला केला होता. चित्रिकरणात सामील 8 महिलांवर बलात्कार झाल्याने देश हादरून गेला आहे. दक्षिण आफ्रिकेत गुन्हय़ांचे प्रमाण तुलनेत खूपच अधिक आहे.
क्रूगर्सडॉर्पमधील घटना देशासाठी लज्जास्पद आहे. चित्रिकरणातील कलाकार तसेच सदस्यांवर खाणींमध्ये काम करणाऱया अवैध कामगारांनी हल्ला केला आहे. या कामगारांना स्थानिक स्वरुपात ‘झामा झामा’ म्हणून ओळखले जात असल्याची माहिती पोलीस मिनिस्टर भेकी सेले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे.
पोलिसांनी संबंधित क्षेत्रात कारवाई करत 84 जणांना अटक केली आहे. पोलिसांसोबतच्या चकमकीत दोन संशयित मारले गेले असून एक जण जखमी झाला आहे. संशयितांचा बलात्काराच्या घटनेशी संबंध आहे की नाही चौकशीतून स्पष्ट होणार आहे. सध्या कुठल्याच आरोपीवर लैंगिक शोषणाचा आरोप ठेवण्यात आलेला नसल्याचे राष्ट्रीय पोलीस प्रमुख फॅनी मासेमोला यांनी सांगितले.
देशभरात निदर्शने
बलात्काराच्या या घटनांप्रकरणी दक्षिण आफ्रिकेत निदर्शने होत आहेत. निदर्शकांच्या एका गटाने न्यायालयासमोर येत जलद न्यायाची मागणी केली आहे. ‘बलात्काऱयांना जामीन नको’, ‘माझे शरीर क्राइम सीन नाही’ असे संदेश असणारे फलक त्यांनी झळकविले आहेत. तसेच या गुन्हय़ानंतर बलात्काऱयांसाठी रासायनिक नसबंदी सुरू करण्याची दीर्घकालीन मागणी पुन्हा जोर पकडू लागली आहे.









