बसमध्ये चढताना चोरी : खानापूर पोलिसात गुन्हा दाखल : चोऱ्यांच्या घटनेत वाढ
खानापूर : खानापूर येथील नवीन बसस्थानकात कारवार बसमध्ये चढताना एका महिलेच्या पर्समधील 8 तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी 2 वाजता घडली. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खानापूर परिसरात अशा चोऱ्यांच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने हे चोर निर्ढावलेले आहेत. बुधवारी दुपारी येथील बसस्थानकातून कारवाला जाण्यासाठी धनश्री सावळू सावंत (राहणार-सकलवाडा, ता. कारवार) या बसमध्ये चढल्या. यानंतर आपले आधारकार्ड दाखवण्यासाठी आपल्या पर्समध्ये हात घातला असता त्यांना आपले पर्स दोन्ही बाजूने कापल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आपल्या पर्समधील आणखी एक लहान पर्स गायब झाल्याचे लक्षात आले. ही बाब त्यांनी बस वाहकाच्या निदर्शनास आणली. बस वाहकाने त्यांना बसमधून खाली उतरुन पोलीस स्थानकात फिर्याद देण्यासाठी सूचना केली. यानंतर धनश्री सावळू सावंत यांनी खानापूर पोलिसात याबाबत माहिती दिली. यात धनश्री सावंत यांचे एकूण 8 तोळ्याचे दागिने लंपास करण्यात आले आहे. यात मंगळसूत्र साडेतीन तोळे, 3 तोळ्याचे काकण, 1 तोळ्याची नेकलेस, अर्ध्या तोळ्याची अंगठी आणि रोख 5 हजार रुपये असा एकूण 8 तोळ्याचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
धनश्री सावंत या आपले माहेर गर्लगुंजी येथे दसऱ्यानिमित्त आल्या होत्या. त्या पुन्हा आपल्या सासरी कारवारला जाण्यासाठी दुपारी बसस्थानकावर आल्या होत्या. कारवार बसमध्ये गर्दी होती. त्या बसमध्ये आपल्या मुलीला घेऊन चढल्यानंतर त्यांनी बस वाहकाला आधारकार्ड दाखवण्यासाठी आपल्या पर्समध्ये हात घातल्यावर पर्सला ब्लेड मारुन कापल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आपली पर्स तपासून पाहिली असता, लहान पर्समध्ये ठेवलेले दागिने चोरी झाल्याचे समजले. त्यांना धक्का बसला. त्यांनी बसमधून उतरुन खानापूर पोलीस स्थानकात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. खानापूर पोलिसानी गुन्हा नेंद करुन घेतला आहे. पुढील तपास चालविला आहे.
खानापूर बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय नसल्याने गुन्हेगारांचा तपास लावणे कठीण काम आहे. खानापूर बसस्थानक व्यवस्थापकानी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय करावी, अशी मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. मात्र याकडे आगारप्रमुखांनी पूर्णपणे कानाडोळा केला आहे. या आधीही अशा अनेक चोरीचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र पोलीस प्रशासन आणि आगार प्रमुखांकडून कोणत्याच सुरक्षेबाबत नियोजन करण्यात आलेले नाही. बसस्थानकात एकही पोलीस नियुक्त करण्यात येत नसल्याने बसस्थानकात वारंवार चोरीचे प्रकार घडत आहेत. या पुढे तरी खानापूर पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांनी खानापूर बसस्थानकात कायमस्वरुपी दोन पोलिसांची बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी व जनतेतून होत आहे.