गृह विषयक समितीत पी. चिदंबरम यांचा समावेश : जयराम रमेश यांनाही मिळाली नियुक्ती
► वृत्तसंस्था नवी दिल्ली
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी 8 संसदीय स्थायी समित्यांची (डीआरएससी) पुनर्रचना केली आहे. संसदीय स्थायी समित्यांच्या 31 सदस्यीय होम पॅनेलमध्ये काँग्रेसचे राज्यसभेतील वरिष्ठ खासदार आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सामील करण्यात आले आहे.

राज्यसभेच्या सभापतींनी चिदंबरम यांना गृहविषयक संसदीय स्थायी समितीच्या सदस्य स्वरुपात नियुक्त केले आहे. ही समिती तीन प्रस्तावित विधेयकांवर चर्चा करत असताना ही नियुक्ती झाल्याने याला विशेष महत्त्व आहे. भारतीय न्याय संहिता विधेयक, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक 2023 आणि भारतीय साक्ष्य अधिनियम विधेयकावर या समितीकडून चर्चा केली जाणार आहे. या तिन्ही विधेयकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 11 ऑगस्ट रोजी संसदेत मांडले होते.
स्थायी समित्यांशी संबंधित 24 विभाग असतात. यातील प्रत्येक समितीत 31 सदस्य असतात, ज्यातील 21 लोकसभा अन् 10 राज्यसभा खासदार असतात. पी. चिदंबरम यांची नियुक्ती काँग्रेसचे. पी. भट्टाचार्य यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त जागेवर झाली आहे. तर पक्षाचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी हे भाजप खासदार बृजलाल यांच्या अध्यक्षतेखालील गृह विषयक समितीत पूर्वीपासून कार्यरत आहेत.
विज्ञान अन् तंत्रज्ञान विषयक समिती
राज्यसभेने एक अधिसूचना करत संसदीय स्थायी समित्यांमधील नियुक्तींची माहिती दिली आहे. राज्यसभेच्या सभापतींनी लोकसभा अध्यक्षांशी सल्लामसलत करत प्रशासकीय अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या 8 विभाग संबंधित संसदीय स्थायी समित्यांची पुनर्रचना केली आहे. याचबरोबर राज्यसभा सभापतींनी काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण वन अणि हवामान बदल समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. 6 प्रमुख संसदीय समित्यांमध्म्ये गृह, माहिती-तंत्रज्ञान, संरक्षण, विदेश, वित्त आणि आरोग्य विषयक समितीचे अध्यक्षपद भाजप किंवा त्याच्या घटकपक्षांकडे आहे.









