पश्चिम बंगालमधील दुर्घटना
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एक भयानक दुर्घटना घडली आहे. दत्तपुकुर पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी सकाळी फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघांनी उपचारादरम्यान प्राण सोडल्याने एकूण 8 जण ठार झाले आहेत. दरम्यान, सदर कारखाना अवैध असल्याचे प्राथमिक तपासाअंती स्पष्ट झाले आहे. ही आग कशी लागली आणि घटनेच्या वेळी फटाक्मयांच्या कारखान्यात किती लोक उपस्थित होते, याचाही तपास सध्या सुरू आहे.

स्फोटाच्या घटनेची माहिती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही दाखल झाल्या होत्या. जगन्नाथपूर गावात ही दुर्दैवी घटना घडली. स्फोटामुळे फटाका कारखान्याची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. स्फोटाच्या आवाजाने हादरलेले आजूबाजूचे लोकही घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली गाडलेल्या लोकांना बाहेर काढण्यात मोलाचे सहकार्य केले. अग्निशमन दलाने आग विझवली. या दुर्घटनेत जखमी झालेले अनेक जण जीवाशी झुंज देत आहेत.
स्फोटात आजबाजूच्या अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीचे छत पूर्णपणे उडून गेले आणि मृतांचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह रस्त्यावर आले होते. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करत तपास सुरू केला आहे. यापूर्वी मे महिन्यात पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रा येथे एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात अशाचप्रकारे स्फोट झाला होता. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर व अवैध कारखान्यांवर छापे टाकण्यात आले. मात्र, तरीही बऱ्याच भागात अवैधपणे फटाकेनिर्मिती सुरू असल्याचा प्रकार नव्या घटनेतून समोर आला आहे









