वृत्तसंस्था/ ब्रसेल्स
बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे 2016 झाली बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याप्रकरणी एका न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाने 6 जणांना हत्या तर दोन जणांना दहशतवादाच्या आरोपाखाली दोषी ठरविले आहे. या दहशतवादी हल्ल्यात 32 जण मारले गेले होते.
10 पैकी 6 आरोपींना ब्रसेल्स विमानतळावर झालेले दोन बॉम्ब स्फोट आणि 22 मार्च 2016 रोजी मेट्रोत बॉम्बस्फोट करण्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. याचबरोबर आणखी दोन जणांना दहशतवादी संघटनेच्या कारवायांमध्ये भाग घेतल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. परंतु याप्रकरणी दोन जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. गुन्हेगारांना सप्टेंबर महिन्यात न्यायालयाकडून शिक्षा सुनावली जाणार आहे.
दोषी ठरलेल्यांमध्ये सलाह अब्देसलाम देखील सामील आहे. सलाह हा पॅरिस येथील हल्ल्यांप्रकरणी मुख्य आरोपी होता. या हल्ल्यात 130 लोक मारले गेले होते. अन्य दोषींमध्ये मोहम्मद अब्रीनी आणि स्वीडिश ओसामा क्रेयम सामील आहे. क्रेयम यानेच ब्रसेल्स विमानतळ अन् मेट्रो स्थानकावर आत्मघाती हल्ला करण्याचा कट रचला होता.









