बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांची संयुक्त कारवाई, बस्तरचे आयजी सुंदरराज पी. यांची माहिती
वृत्तसंस्था/ बिजापूर
नक्षलीविरोधातील कारवाई अद्यापही थांबवण्यात आलेली नाही. शनिवारी अगदी पहाटेपासूनच सुरक्षा दलाने संयुक्त कारवाई करण्यास प्रारंभ केला. सुरक्षा दले आणि नक्षलीमध्ये जोरदार चकमक उडाली. यामध्ये आतापर्यंत 8 नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. याबाबतची माहिती बस्तर विभागाचे आयजी आणि कारवाईचे प्रमुख सुंदरराज पी. यांनी दिली आहे. गंगालूरच्या जंगल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षली जमा झाल्याची खबर मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे दोन वाजल्यापासून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई सुरु करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सुरक्षा दले आणि नक्षलींमध्ये चकमक सुरु होती. गंगालूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील जंगल भागात ही कारवाई करण्यात आली. सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलींना पहिल्यांदा शरण येण्याचे व शस्त्र खाली ठेवण्याचे आवाहन केले. तथापि नक्षलींनी जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरु केला. त्यानंतर मात्र सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला तितकेच कठोर प्रत्युत्तर दिले. पहिल्याच तडाख्यात जवानांनी 8 नक्षलींना यमसदनी पाठवले. त्यानंतर थांबून थांबून गोळीबार सुरुच राहिला.
चार दलांचे संयुक्त पथक
नक्षलींविरोधात कारवाई करण्यात तरबेज असणारे बिजापूर डीआरजी पथक, एसटीएफ, कोब्रा 202 आणि सीआरपीएफ 222 बटालियनच्या जवानांनी या संयुक्त कारवाईमध्ये सहभाग घेतला. संयुक्त पथकाचे हे जवान नक्षलींच्या अ•dयाजवळ पोहोचताच त्यांच्यावर माओवादी नक्षलींनी गोळीबार सुरु केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. आठ नक्षलींना ठार केल्यानंतर माओवाद्यांचा जोर पूर्णपणे ओसरला. मात्र ते दाट जंगलामध्ये पळून गेले असल्याचा संशय आहे. त्यामुळे संयुक्त पथकाचे जवान अद्यापही त्या परिसरात कसून शोध घेत असल्याचे तसेच ही कारवाई अजूनही सुरुच ठेवली जाणार असल्याचे सुंदरराज यांनी स्पष्ट केले.
ठार झालेल्यांमध्ये माओवाद्यांमधील मोठे कमांडर असल्याचे सांगितले जात आहे. तथापि अद्यापही त्यांची ओळख पटलेली नाही. मात्र या कारवाईने नक्षलींचे मनोधैर्य खच्चीकरण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरात शोध सुरु असून अजून नक्की किती नक्षलींचा मृत्यू झाला ते सांगता येणार नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणाहून शस्त्रsही जप्त केली आहे. त्याचीही माहिती नंतर दिली जाईल. नक्षलींनी मुख्य प्रवाहात दाखल व्हावे, अशी सरकारची अपेक्षा आहे. मात्र देशविरोधी व जनविरोधी कारवाया करणाऱ्या नक्षलींची गय केली जाणार नाही. हे शोध अभियान अधिक गतीमान आणि कठोर केले जाईल. नक्षलवादाविरोधात गोळीच्या बदल्यात गोळी ही नीती असल्याचेही सुंदरराज पी. यांनी स्पष्ट केले.









