सायबर गुन्हेगारांनी भाग्यनगरच्या रहिवाशाला ठकवले
बेळगाव : मेगा गॅसच्या नावाने फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. तुम्ही 24 तास गॅसपुरवठ्याचे बिले भरला नाही, त्यामुळे तुमचे कनेक्शन का तोडू नये? अशी विचारणा करीत सायबर गुन्हेगारांनी एका ग्राहकाच्या बँक खात्यातील 8 लाख रुपये हडप केले आहेत. रविवारी ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. भाग्यनगर येथील एका ग्राहकाने फिर्याद दिली आहे. येथील सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांकडून मेगा गॅस ग्राहकांची फसवणूक सुरू आहे. हे प्रकार थांबता थांबेनात. सातत्याने जागृती करूनही कंपनीचे ग्राहक सायबर गुन्हेगारांच्या गळाला लागत आहेत.
व्हॉट्सअॅपवर एक मेसेज येतो, गॅस कनेक्शनसंबंधीचे बिल भरले नाही, रात्रीपर्यंत भरले नाही तर कनेक्शन तोडले जाईल, असा तो मेसेज असतो. गैरसोय टाळण्यासाठी लगेच या क्रमांकावर संपर्क साधा, असा सल्ला देत एक मोबाईल क्रमांक दिलेला असतो. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर लगेच ऑनलाईन बिल भरण्यास सांगितले जाते. भामट्यांवर विश्वास ठेवून थकीत बिल भरण्याची तयारी दर्शविल्यानंतर ओटीपी मागवून बँक खात्यातील रक्कम हडप केली जाते. बेळगाव शहर व उपनगरात गेल्या तीन महिन्यांत असे अनेक गुन्हे घडले आहेत. सायबर क्राईम विभागाकडून जनजागृती करण्यात आली होती. याबरोबरच मेगा गॅस कंपनीच्यावतीनेही जागृतीची मोहीम राबविण्यात आली होती.
जागृती करूनही फसवणुकीचे प्रकार
ध्वनीक्षेपकावरून जागृती करण्याबरोबरच घरोघरी भेट देऊन ग्राहकांना सायबर गुन्हेगारांच्या कारवायांविषयी माहिती देण्यात आली होती. अशा पद्धतीने जागृती करूनही फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. रविवारी भाग्यनगर येथील एका ग्राहकाची फसवणूक झाली आहे. यासंबंधी सायबर क्राईम विभागाने तपास हाती घेतला आहे.









