हॉटेलमध्ये घुसून दहशतवाद्यांनी केला गोळीबार, अनेक जखमी
@ मोगादिशू / वृत्तसंस्था
सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे शुक्रवारी रात्री उशिरा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी हयात हॉटेलमध्ये घुसून गोळीबार केला, ज्यामध्ये 8 लोक ठार झाले तर 9 जखमी झाले. याआधी हयात हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या दोन कारमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. स्फोट घडवल्यानंतर दहशतवादी हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हॉटेलमधील सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना दहशतवाद्यांवर अंकुश मिळवता आला नाही.

हॉटेलवरील हल्ल्याच्या घटनेनंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या संघर्षात मोगादिशूचे गुप्तचर प्रमुख मुहिद्दीन मोहम्मद जखमी झाले. तसेच 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली. इस्लामिक दहशतवादी गट अल-शबाबने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वी 28 जुलै रोजी सोमालियामध्ये झालेल्या वेगवेगळय़ा बॉम्बहल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला होता. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतही असाच हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये घुसून गोळीबार आणि स्फोट केला होता. या हल्ल्यात 9 हल्लेखोरांसह सुमारे 180 लोक मारले गेले. येथे 10 दहशतवादी 10 एके-47, 10 पिस्तूल, 80 ग्रेनेड, 2,000 गोळय़ा, 24 मॅगझिन, मोबाईल फोन, स्फोटके आणि टायमर घेऊन दक्षिण मुंबईत घुसले होते









