निर्णय आमच्यासाठी धक्कादायक : भारताची प्रतिक्रिया
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतार देशात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांवर हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आठ महिन्यांपूर्वी त्यांना या देशात अटक करण्यात आली होती. त्यांना फाशीची शिक्षा मिळणे आमच्यासाठी धक्कादायक आहे, आम्हाला अशा निर्णयाची अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया या निर्णयावर भारताने व्यक्त केली आहे. या संदर्भात आम्ही या अधिकाऱ्यांच्या कुटुंबांच्या संपर्कात आहोत. तसेच पुढच्या कारवाईसंबंधी आणि त्यांची फाशी टाळण्यासाठी आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. सविस्तर निर्णय हाती आल्यानंतर त्याचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर पुढच्या कारवाईसंबंधी पावले उचलली जातील, असे स्पष्ट करण्यात आले.
काय आहे प्रकरण?
फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले हे अधिकारी भारतीय नौदलात विविध पदांवरुन निवृत्त झालेले आहेत. त्यांच्यात काही उच्च पदस्थ अधिकारीही समाविष्ट आहेत. या अधिकाऱ्यांवर भारताच्या युद्धनौकांचे व्यवस्थापनही सोपविण्यात आले होते. ते डहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी अँड कन्सल्टन्सी नामक एका कंपनीसाठी काम करीत होते. ही एक खासगी कंपनी आहे. ही कंपनी कतारमध्ये सशस्त्र सैनिकांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत होती. भारताचे हे नौदल अधिकारी या कंपनीत कामाला होते. त्यांनी इस्रायलसाठी हेरगिरी केली असा आरोप होता.
अधिकाऱ्यांची नावे
कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बीरेंद्रकुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ट, कमांडर अमित नापाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नौसैनिक रागेश अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन याचिका अनेकदा फेटाळण्यात आल्या होत्या. त्यांना मोकळे करावे यासाठी भारताने बरेच प्रयत्न केले होते. तसेच अजूनही हे प्रकरण कतारच्या शक्य तितक्या उच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न भारताकडून केला जात आहे. तथापि, कतारचे प्रशासन कोणतीही सौम्यता दाखविण्यात तयार नसल्याचे समजते.
आरोप नाकारले
कोणतीही हेरगिरी केल्याचा आरोप या अधिकाऱ्यांनी नाकारला होता. त्यांना पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयने फसवून या प्रकरणात गोवल्याचा आरोप भारताने केला आहे. त्यांच्याविरोधात कोणताही पुरावाही आढळला नव्हता, असे भारताचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पुढे काय केले जाणार याकडे या क्षेत्रातील संबंधितांचे लक्ष लागून राहिल्याचे सांगण्यात आले आहे.









