महापालिकेची कारवाई सुरूच : नागरिकांतून समाधान
बेळगाव : महापालिकेच्या पशु संगोपन विभागाकडून गुरुवारपासून शहरातील मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री पकडण्याची मोहीम पुन्हा तीव्र करण्यात आली आहे. शुक्रवारी विविध ठिकाणी 8 कुत्री आणि 6 जनावरे पकडून त्यांची रवानगी श्रीनगर येथील गोशाळेत करण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शहर व उपनगरात भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांची संख्या वाढली असल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करण्याची वेळ आली आहे. सदर जनावरे आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात असली तरीदेखील गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात येत होते. अलिकडेच महापालिकेने भटकी कुत्री आणि मोकाट जनावरे पकडण्यासाठी नव्या ठेकेदाराची नियुक्ती केली आहे.
सदर ठेकेदारांकडून काम सुरू झाले आहे. गुरुवारी विविध ठिकाणी कुत्री आणि जनावरे पकडण्यात आली. शुक्रवारीदेखील ही कारवाई सुरूच ठेवण्यात आली. विविध ठिकाणी आठ कुत्री तर सहा जनावरे पकडण्यात आली. दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र सदर कारवाईत सातत्य ठेवून शहर कुत्री आणि जनावरेमुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाचे वरिष्ठ पशु निरीक्षक राजू संकण्णावर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे. पकडलेल्या कुत्र्यांवर श्रीनगर येथील एबीसी सेंटरमध्ये शस्त्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे भविष्यात कुत्र्यांची पैदास कमी होईल, असा विश्वास मनपा अधिकाऱ्यांनी बोलून दाखविला आहे.









