घटस्फोटापेक्षा समेट करण्याकडे अधिक लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर अनेकजण घटस्फोट किंवा पोटगीसाठी दावा दाखल करत आहेत. त्यामुळे जिल्हा कौटुंबिक न्यायालयामध्ये तसेच जिल्ह्यातील सर्वच न्यायालयांमध्ये हे खटले वाढत आहेत. किरकोळ वाद झाल्यानंतर अशी टोकाची भूमिका घेणे योग्य नसते. बऱ्याचवेळा गैरसमजुतीतून हे प्रकार घडत असतात. त्यामुळे लोकअदालतीमध्ये हे खटले समेट करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्यात आले. शनिवारी एकूण आठ खटले समेट झाले आहेत. त्यामुळे पुन्हा ती दाम्पत्ये नव्याने आपल्या संसाराला लागली आहेत.
सध्याच्या धावत्या युगामध्ये या खटल्यांची संख्या वाढत चालली आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच घटस्फोट किंवा पोटगीसाठी दावा दाखल करण्याच्या घटना वाढल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रेमविवाह होऊनही त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होत आहे. अहंकार आणि हेकेखोरपणा कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी न्यायाधीशांनी समुपदेशन करून अनेक खटले समेटाकडेच नेले आहेत.
मागील लोकअदालतीमध्ये 21 खटले समेट करण्यात आले होते. त्यानंतर या लोकअदालतीत आठ खटले समेट केले आहेत. निपाणी 3, गोकाक 1, बेळगाव 2, चिकोडी 2 असे खटले समेट झाले आहेत. दोन मुले होऊनही पती-पत्नी विभक्त रहात होते. मात्र, त्यांना समजूत काढून एकत्र नांदण्यास भाग पाडण्यात आले.
मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफा हुसेन एस. ए. यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. घटस्फोट किंवा पोटगी मागणे हा पर्याय नाही. तेव्हा या सर्व दाम्पत्यांनी प्रथम आपल्या आयुष्याचा आणि भविष्याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी वारंवार केले आहे. त्याला प्रतिसाद मिळत असून आता समेट करण्यासाठी अनेक दाम्पत्ये पुढे येत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.









