2022-23 साठी 0.05 टक्के वाढ : 1 लाख ठेवीवर मिळणार 8,150 रुपये व्याज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आर्थिक वर्ष 2022-23 साठी 8.15 टक्के व्याजदर घोषित केला आहे. यापूर्वी तो 8.10 टक्के असल्यामुळे सुधारित दरानुसार 0.05 टक्के इतकी वाढ झाली आहे. सोमवार, 24 जुलै 2023 रोजी एक परिपत्रक जारी करून ईपीएफ खात्यावरील व्याजदराची घोषणा करण्यात आली. हे व्याजदर 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अधिकृत व्याजदर बनवण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना निघाल्यानंतरच नवीन व्याजदरानुसार ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधीच्या योगदानाच्या व्याजदरात वाढ केल्याचे जाहीर केले आहे. 5 कोटीहून अधिक ईपीएफओ खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय ईपीएफच्या प्रत्येक सदस्याच्या हितासाठी त्याच्या खात्यात व्याज जमा करण्यास कलम 1952 च्या परिच्छेद 60 (1) अंतर्गत मान्यता दिल्याचे ईपीएफओने जारी केलेल्या अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. ईपीएफओ खात्यावरील व्याजदरात वाढ करण्याच्या घोषणेशी संबंधित परिपत्रक सोमवार 24 जुलै रोजी जारी करण्यात आले आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ खात्यावर 8.15 टक्के व्याजदर निश्चित करत तो मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. एकंदर सुधारित व्याजदरानुसार 1 लाख रुपये इतक्या ठेवीवर खातेधारकांना 8,150 रुपये व्याजदर जमा होणार आहे. ऑगस्ट 2023 पासून व्याजाचे पैसे खात्यात पोहोचण्यास सुऊवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ईपीएफओने झोन कार्यालयांचे प्रभारी आणि प्रादेशिक कार्यालयांचे प्रभारी अधिकारी यांना ही मंजुरी मिळाल्यानंतर सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक आदेश जारी करण्यास सांगितले आहे.
गेल्या काही वर्षातील व्याजदर
2021-22 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने 8.10 टक्के व्याजदर निश्चित केला होता. हा जवळपास 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर होता. 1977-78 मध्ये ईपीएफओने 8 टक्के व्याजदर निश्चित केला होता. पण तेव्हापासून व्याजदर सातत्याने 8.25 टक्के किंवा त्याहून अधिक वाढला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65 टक्के, 2017-18 मध्ये 8.55 टक्के, 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि 2015-16 या आर्थिक वर्षात 8.80 टक्के व्याजदर होता.
महिन्याला वेतनाच्या 12 टक्के योगदान
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हे पगारदार कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य योगदान आहे. कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यात जितकी रक्कम जमा केली जाते तितकीच रक्कम कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यात जमा करण्यास नियोक्ता देखील बांधील आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचे वेतनातील 12 टक्के इतके अंशदान प्रतिमहिना त्याच्या ईपीएफ खात्यात जमा होत असते.









