तैवानमधील घटना : खोलीबाहेर पाय ठेवणे पडले महागात
कोरोनावर जवळपास पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी तैवानला ओळखले जाते. चीनचा शेजारी देश असूनही तैवानमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या नसल्यात जमा आहे. परंतु तैवान कोरोनाच्या नियमांसंबंधी किती कठोर आहे, हे एका घटनेवरून स्पष्ट होते. तेथे 8 सेकंदांच्या एका चुकीसाठी एका व्यक्तीवर अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मूळचा फिलिपाईन्सचा नागरिक असलेल्या एका व्यक्तीला तैवानच्या गाऊशुंग शहरातील हॉटेलमध्ये विलगीकृत करण्यात आले होते. विलगीकरणात असताना या व्यक्तीने काही सेकंदांसाठी स्वतःच्या खोलीतून बाहेर पडत हॉलमध्ये धाव घेतली होती.
खोलीतून बाहेर पडून काही सेकंदांसाठी हॉलमध्ये पोहोचण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. यासंबंधी हॉटेलच्या व्यवस्थापनाने आरोग्य विभागाला माहिती दिली असता संबंधित व्यक्तीवर अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तैवानच्या विलगीकरणाच्या नियमांच्या अंतर्गत लोकांना स्वतःच्या खोलीबाहेर पडण्याची अनुमती नाही. गाऊशुंग शहरात 56 क्वारेंटाईन हॉटेल्स असून यात तीन हजार खोल्यांची सुविधा आहे.
सुमारे 2 कोटी 30 लाख लोकसंख्या असलेल्या तैवानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे केवळ 716 रुग्ण सापडले आहेत. तर 7 जण या संसर्गामुळे दगावले आहेत. तैवानने अन्य देशांप्रमाणे टाळेबंदी लागू केली नाही तसेच सर्वसामान्य लोकांच्या ये-जा करण्यावरही बंधने लादलेली नाही.