भारतात कोरोना संकटामुळे होळी घरातच साजरी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण सर्वसाधारण काळात होळी देशभरात मोठय़ा धुमधामासह साजरी करण्यात येते. भारताप्रमाणेच रंगांचा सण अन्य देशांमध्येही वेगवेगळय़ा नावांसह साजरा करण्यात येतो.
शेजारी देश असलेल्या हिंदुबहुल नेपाळमध्ये भारतातील जवळपास सर्वच सण साजरे करण्यात येतात. पण होळीचे तेथील स्वरुप भिन्न असते. तेथे याला फागु पुन्हि म्हटले जाते, जे फाल्गुन पौर्णिमेशी मिळतेजुळते आहे. तेथे पूर्वी राजेशाही असताना महालात एक बांबूचा स्तंभ उभारून सणाचा प्रारंभ केला जायचा. आठवडाभर हा सण साजरा करण्यात येत होता. पर्वतीय क्षेत्रात भारतापेक्षा एक दिवस आधी होळी साजरी होते. तर तराईमध्ये भारतासारखाच सण साजरा होतो.

म्यानमारमध्ये होळीशी मिळताजुळता सण मेकांग नावाने साजरा करण्यात येतो. काही भागात याला थिंगयानही म्हटले जाते. या दिवशी लोक परस्परांवर पाण्याचा मारा करतात आणि यामुळे सर्व पापं धुवून निघतात असे मानले जाते. मागील काही वर्षांपासून तेथे पाण्यासह रंगांचीही उधळण होऊ लागली आहे.
मॉरिशसला तर दुसरा भारतच म्हणण्यात येते. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या देशात होळी वसंत पंचमीपासून सुरू होते आणि जवळपास महिनाभर चलाते. येथे होलिका दहनही होते. याचबरोबर चीनच्या अनेक भागांमध्ये चिनी नववर्षावेळी पाण्याचा मारा करून सण साजरा करण्यात येतो.
पोलंडमध्ये अर्सीना नावाचा सण साजरा करण्यात येतो, जो होळीप्रमाणेच रंगांचा उत्सव आहे. या दिवशी लोक फुलांचे रंग आणि अत्तराने होळी खेळतात. पोलंडमध्येही या दिवसाकडे शत्रुत्व विसरण्याचे पर्व म्हणून पाहिले जाते. याचप्रकारे चेक प्रजासत्ताकमध्ये बलिया कनौसे नावाचा सण साजरा होतो, ज्यात रंगांची उधळण केली जाते.

रोममध्ये रेडिका हा होळीसारखाच सण साजरा केला जातो. पण हा सण मे महिन्यात साजरा होतो. रंग खेळण्यापूर्वीच्या रात्री येथे लाकडं जमवून त्यांचे दहन केले जाते. दुसऱया दिवशी सकाळी लोक नाचगाण्यासह रंगांची उधळण करतात. या सणामुळे अन्नदेवता फ्लोराची कृपादृष्टी राहून भरघोस पिक येत असल्याचे इटलीत मानण्यात येते.
आफ्रिकन देशांमध्ये ओमेन बोंगा सणानिमित्त आग पेटवून अन्नदेवतेचे स्मरण केले जाते. रात्रभर आगीच्या चहुबाजूने लोक नाचतात-गात राहतात. थायलंडमध्ये सांग्क्रान या सणानिमित्त लोक बौद्ध मठांमध्ये जात तेथील भिक्षूंकडून आशीर्वाद प्राप्त करतात आणि परस्परांवर अत्तराचे पाणी शिंपडत असतात.









