प्रतिनिधी / शाहुवाडी
केंद्र सरकारने केलेले कृषी विषयक कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून पुकारलेल्या 8 डिसेंबरच्या भारत बंदला मलकापूर व्यापारी असोसिएशनसह शाहूवाडी तालुक्यातील व्यापारी बांधवांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई भारत पाटील यांनी दिली.
केंद्र शासनाने कृषी विधेयक मंजूर करून शेतकरी विरोधी भूमिका घेतली असल्याची भूमिका विविध संघटनांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली येथे गेल्या आठ – दहा दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आठ डिसेंबर रोजी विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला शाहूवाडी तालुक्यात उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असून या दिवशी सर्व व्यवहार बंद ठेवून शेतकरी विरोधी विधेयकाला पाठिंबा दिला असल्याची माहिती भाई भारत पाटील यांनी दिली आहे. या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहनही संघर्ष समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.