नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
मोदी सरकार सत्तेत येऊन आज (30 मे) सात वर्षे पूर्ण झालीत तर सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अमित शहा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मागील सात वर्षात देशातील जनतेनं पंतप्रधान मोदी यांच्या सेवा आणि सर्मपणावर विश्वास दाखवला आहे. यासाठी मी देशवासियांना नमन करतो. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवून भारताच्या विकासाचा गाडा अखंडितपणे पुढे घेऊन जाऊ, याचा मला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तर दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, या सात वर्षांमध्ये मोदीजींनी देशहिताला सर्वोच्च मानून दृढनिश्चय आणि सर्वांसाठी आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरीब, शेतकरी आणि वंचित वर्गांना विकासाच्या मुख्य धारेशी जोडलं. त्यांचं जीवनमान उंचावलं. त्याचबरोबर आपल्या सशक्त नेतृत्वाच्या बळावर भारताला एक मजबूत राष्ट्र बनवल्याचे अमित शहा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यानिमित्त भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय. त्यामध्ये सांगण्यात आलंय की, आज कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा करु नये वा कोणत्याही प्रकारचा उत्सव स्वरुपाचा कार्यक्रम आयोजित करु नये. त्या ऐवजी कल्याणकारी कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि कोरोना प्रभावित लोकांची मदत करावी.









