वर्षानुवर्षे लाभार्थ्यांची फसवणूक
वार्ताहर/वारणा कापशी
अमेणी (ता. शाहुवाडी) येथील जोतिर्लिंग सेवा सोसायटीकडे असणार्या रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या दुकानाविरोधात नागरिकांनी संबंधित अधिकार्यांकडे वेळोवेळी तक्रार केली होती. लाभार्थांच्या तक्रारीनुसार चौकशी करून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या दुकानाचा परवाना रद्दची तातडीची नोटीस सोसायटीच्या चेअरमन व सचिवास दिली आहे.
या नोटीसीमध्ये असे नमुद करण्यात आले आहे की, अमेणी येथील सुनिता अशोक बागम आणि आश्विनी अनिल माने यांनी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांचेकडे रेशन दुकानदारा विरोधात तक्रार केली. सदर तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, रेशन दुकानदार हा लाभार्थ्याना दिले जाणारे गहू व तांदुळ नियमापेक्षा कमी देवुन रेशनकार्ड वरही कमी किलोची नोंद करत असे. प्रत्यक्षात ऑनलाईन पावती मात्र जास्त किलोची काढत असे. याची पडताळणी केली असता, असे निदर्शनास आले की, सुनिता बागम यांना नऊ किलो गहू व सहा किलो तांदुळ देऊन रेशनकार्डवरती ही अशी नोंद आहे. ऑनलाईन पावती मात्र बारा किलो गहू व आठ किलो तांदुळ अशी काढली आहे. याबाबत रेशन दुकानदाराने तहसिलदार शाहुवाडी यांचेसमोर केलेला खुलासा हा मोघम स्वरूपाचा असुन, तक्रारीमध्ये तथ्य दिसून आले आहे.
जीवनावश्यक वस्तु व कायद्याप्रमाणे भारतीय दंडसंहिता १८६० ( ४५ ) च्या कलम १८८ अन्वये साथ व रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे सदर दुकानाची अनामत रक्कम जप्त करणे क्रमप्राप्त आहे. असा अहवाल तहाशिलदार शाहुवाडी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापुर यांचेकडे सादर केला. शाहुवाडी तहसिलदारांच्या या अहवालानुसार सदरची बाब गंभीर स्वरूपाची असल्याने वस्तु अधिनियम १९५५ मधील तरतुदी अन्वये जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापुर यांचे मार्फत अमेणी येथील रेशन दुकानाची अनामत जप्त करुन परवाना रद्द करण्यात आला.








