पायाभूत सुविधांसह आरोग्य, शिक्षणासाठी सर्वाधिक निधी
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे अर्थमंत्री कैलाश गेहलोत यांनी बुधवारी विधानसभेमध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दिल्लीचे एकूण बजेट 78 हजार 800 कोटींचे असून पायाभूत सुविधांवर 21 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अर्थसंकल्पात दिल्ली मॉडेलवर भर देण्यात आला असून सुंदर आधुनिक दिल्लीचा नारा देण्यात आला आहे. गेल्या वेळी दिल्ली सरकारचे बजेट 75,800 कोटी ऊपये होते.
अर्थमंत्री कैलाश गेहलोत यांनी बुधवारी अर्थसंकल्प सादर करताना राष्ट्रीय राजधानीसाठी अनेक सुविधांची घोषणा केली. पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 26 नवीन उड्डाणपूल, 3 डबल डेकर फ्लायओव्हर, अंडरपास आणि पूल बांधण्याची घोषणा केली आहे.
दिल्ली दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्यानंतर गेहलोत यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. मनीष सिसोदिया तुरुगात गेल्यानंतर कैलाश गेहलोत यांना दिल्लीचे नवे अर्थमंत्री बनवण्यात आले आहे. भाषणाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ‘भगवान राम’ असे संबोधले.
अर्थसंकल्पात आरोग्यासाठी 9,742 कोटी ऊपये आणि शिक्षण क्षेत्रासाठी 16,575 कोटी ऊपये बजेटमध्ये देण्यात आले आहेत. सरकारी शाळा आणि शिक्षकांना नवीन टॅबलेट देण्यात येणार आहेत. प्रत्येक सरकारी शाळेला 20 नवीन संगणक दिले जाणार आहेत. फ्रेंच, जर्मन, जपानी आणि स्पॅनिश भाषाही शाळांमध्ये शिकवल्या जाणार आहेत.
1,600 इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार
सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी 3,500 कोटी ऊपये देण्यात आले आहेत. दिल्लीला या वर्षाच्या अखेरीस 1600 इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत. 2025 पर्यंत शहर वाहतुकीत 10 हजारांहून अधिक बसेस असतील. या बसपैकी 80 टक्के बस इलेक्ट्रिक असतील. सध्याच्या 57 बस डेपोचेही विद्युतीकरण करण्यात येणार आहे.









