ऑनलाईन टीम / मुंबई
‘झी मराठी’ वरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका राजकीय दबावामुळे बंद करण्यात येत आहे, अशा चर्चांना आता सोशल मीडियावर उधाण आलंय. यावरुनच मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलंय . ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेवरून शरद पवारांना गोवण्याचा प्रयत्न हा अत्यंत दुर्दैवी आणि हीन दर्जाचा असल्याचं त्यांनी व्हिडीओत म्हटलंय. हा व्हिडीओ त्यांनी फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
“सोशल मीडियाद्वारे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेविषयी आणि त्या अनुषंगाने आदरणीय पवार साहेबांना यामध्ये गोवण्याचा दुर्दैवी आणि अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न होतोय. कारण आदरणीय पवार साहेबांचा कलाविषयीचा दृष्टीकोन आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय झाल्यापासून कधीही पवार साहेबांनी हे दाखवा, हे दाखवू नका असं कधीही सांगितलं नाही. नेहमी वडिलधारांच्या भूमिकेतून काही अडचण तर नाही ना, अशी आपुलकीनं नक्कीच चौकशी केली. त्यामुळे सोशल मीडियावर ज्या बातम्या फिरवल्या जात आहेत, त्यांमध्ये काहीच तथ्य नाही. सोमवार ते शनिवारी रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका सुरू आहे. त्यामुळे कोणाच्या दबावामुळे मालिका बंद होतेय ,यामध्ये कोणतेच तथ्य नाही. जे कोणी अशा बातम्या फिरवण्याचा प्रयत्न करतायत, त्यातून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, अशा उपद्रवी मूल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी मी महाराष्ट्र पोलीस आणि मुख्यमंत्री कार्यालयात केली आहे. लवकरात लवकर अशा उपद्रवी मूल्यांना आळा बसेल अशी मी अपेक्षा करतो आणि तमाम शिवशंभूभक्तांना मी हा नक्कीच विश्वास देऊ इच्छितो की ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास उलगडून दाखविण्यासाठी सुरु आहे, ती अव्याहतपणे कथा संपेपर्यंत तशीच सुरू राहील, असं अमोल कोल्हे यांनी व्हिडीओत म्हटलं आहे.