सांगली / प्रतिनिधी
जगद्गुरू तुकोबाराय साहित्य गौरव पुरस्काराने शाहीर राजा पाटील यांचा केलेला गौरव म्हणजे सांस्कृतिक लढाईचा नव्याने केलेला प्रारंभ आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत जी. के. ऐनापुरे यांनी व्यक्त केले.
जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने कवठेमंकाळ येथील ज्येष्ठ शाहीर राजा पाटील यांना जगद्गुरू तुकोबाराय साहित्य गौरव पुरस्कार जी. के. ऐनापुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संत तुकाराम यांच्या जयंतीनिमित्त सांगली येथील मराठा सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निर्मला पाटील या होत्या.
यावेळी बोलताना ऐनापुरे म्हणाले, सांगलीत एक नवीन सांस्कृतिक वातावरण तयार होत आहे. सांस्कृतीक लढाई जिंकायची असेल तर राजा पाटील यांच्यासारख्या परिवर्तनाच्या शिलेदाराचा सन्मान केला पाहिजे तरच समाज वैचारिक दृष्ट्या सक्षम होईल. राजा पाटील यांनी तमाशा क्षेत्रात काम करता करता आपल्या विचारांची प्रगल्भता दाखवत तुकाराम महाराजांच्या हत्येचा कट पोवाड्याच्या माध्यमातून समाजाच्या समोर उघड केला आहे. एक लेखक कलाकार म्हणून त्यांचा हा सन्मान योग्य आहे.
पुरस्काराला उत्तर देताना शाहीर पाटील म्हणाले, गेल्या सहा दशकांमध्ये तुकोबारायांच्या नावाने मिळालेला हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. तुकोबा सदेह वैकुंठाला पाठवण्याचे कारस्थान करून त्यांची हत्या करण्यात आली होती तो दिवस म्हणजे तुकाराम बीज असते आणि तो दिवस आपण उत्साहात साजरा करतो परंतु त्यांची जयंती कुठे साजरी होत नाही. तुकोबांचे विचार संपविण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला परंतु आपण विचार पुढे नेले पाहिजेत.
तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी जाधव यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाबर यांनी प्रस्ताविक केले. शाहीर चंद्रकांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सुवर्णा पाटील यांनी आभार मानले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अमृतराव सूर्यवंशी, माजी तहसिलदार शेखर परब, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शितल मोरे, संभाजीनगर चे जिल्हाध्यक्ष राजू पाटील, नानासो काणे, शशिकला गावडे, अधिका बाबर उपस्थित होते.








