सर्पदंश-विजेचा धक्का : कृषी खात्यातर्फे सुरक्षितता-जागृतीची गरज
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात मागील दोन वर्षांत सर्पदंश आणि विजेचा धक्का बसून 77 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात 7.40 लाख हेक्टर क्षेत्रात विविध पिके आहेत. त्यामध्ये भात, ऊस, भुईमूग, मका, ज्वारी, द्राक्षे आदींचा समावेश आहे. शेतीच्या कामावेळी शेतकऱ्यांना सर्पदंश आणि रात्रीच्यावेळी विजेचा धक्का बसून शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. शेतीसाठी रात्रीच्यावेळी थ्रीफेज विजेचा पुरवठा केला जातो. दरम्यान शेतकऱ्यांना अशावेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेताकडे जावे लागते. दरम्यान अपघात घडून शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत.
त्याचबरोबर शेतात औषध फवारणी, गवत कापणी आणि इतर कामांवेळी सर्पदंश होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सुरक्षितता आणि खबरदारीचा उपाय म्हणून कृषी खात्याने जागृती करावी, अशी मागणीही होऊ लागली आहे. 2023 ते 2025 जानेवारी दरम्यान 54 घटना घडल्या आहेत. यातील पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळाली आहे. 2024-25 या वर्षात 26 घटना घडल्या आहेत. शेतीकाम करताना अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय भरपाई मिळते. हे अद्याप बहुतांशी शेतकऱ्यांना माहीत नाही. यासाठी कृषी खाते आणि हेस्कॉमतर्फे जागृती होणे आवश्यक आहे. काहीवेळा सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनदेखील शासनाकडून वेळेत भरपाई मिळत नसल्याच्या तक्रारी कुटुंबीयांनी केल्या आहेत.
चिकोडी, अथणी परिसरात अधिक घटना
जिल्ह्यात 2024-25 या वर्षात 26 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चिकोडी येथील पाच तर अथणी तालुक्यातील चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. सौंदत्ती, रायबाग तालुक्यातील प्रत्येकी 3, बैलहोंगल, रामदुर्ग, मुडलगी तालुक्यातील प्रत्येकी 2, तर बेळगाव, गोकाक, हुक्केरी, खानापूर, निपाणी तालुक्यात प्रत्येकी एक शेतकऱ्याचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत
सर्पदंश किंवा अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 2 लाखांची मदत दिली जाते. शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांनी 3 महिन्यांच्या आत भरपाईसाठी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. याबरोबरच शवविच्छेदन अहवालासह पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची माहिती देणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत केवळ 5 कुटुंबीयांची भरपाई प्रलंबित
सर्पदंश किंवा अपघाती मृत्युमुखी पडणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाते. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. सद्यस्थितीत केवळ 5 कुटुंबीयांची भरपाई प्रलंबित आहे. अर्ज केलेल्या इतर कुटुंबीयांना भरपाई मिळाली आहे.
-शिवनगौडा पाटील, (सहसंचालक कृषी खाते)









