धर्मादाय खात्याचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्याकडून दखल : आयुक्तांकडून परिपत्रक जारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
धर्मादाय खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या मंदिरातील पुजाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तस्तिक (पूजाअर्चा) निधीसाठी राज्य सरकारने 77 कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्यातील धर्मादाय खात्याच्या मंदिरांचा तस्तिक भत्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित असून पुजाऱ्यांना तस्तिकचे पैसे न मिळाल्याने ते अडचणीत आले होते. ही बाब परिवहन तथा धर्मादाय खात्याचे मंत्री रामलिंगारेड्डी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी बोलून 77 कोटी 85 लाख 54 हजार 497 रुपये तस्तिक भत्त्याचा पहिला हप्ता मंजूर केला आहे.
यासंदर्भात धर्मादाय खात्याच्या आयुक्तांनी परिपत्रक जारी केले असून शासनाकडून मंजूर करण्यात आलेली तस्तिक रक्कम कोणतेही बंधन न लादता आणि संबंधितांच्या खात्यातून विलंब न लावता थेट पुजाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
धर्मादाय खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या मंदिरातील पुजाऱ्यांना तस्तिक निधी न दिल्यामुळे आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तस्तिक निधीचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. सन 2023-24 चा पहिला हप्ता म्हणून 77,85,54,497 रुपये वितरीत करण्यात आले आहेत. कोणत्याही तरतुदीशिवाय तहसीलदारांच्या खात्यातून संबंधित संस्थात्मक मंदिरांना त्वरित देण्यात यावे. तेथून ती पुजाऱ्याच्या खात्यात जमा करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील धर्मादाय खात्याच्या अधिकाऱ्यांना केएफसी फॉर्म 62-बी मधील खर्चाची स्लिप तहसीलदारांकडून प्राप्त करून ती जारी केलेल्या रकमेच्या वाटपाबाबत धर्मादाय खात्याच्या आयुक्त कार्यालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी मंदिरातील पुजाऱ्यांना मिळणारे अनुदान धर्मादाय खात्याकडून रोखण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे नाराजी व्यक्त होत होती. तसेच भाजपही याला राजकीय रंग देण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, परिवहन तथा धर्मादाय खात्याचे मंत्री रामलिंगारेड्डी यांनी तातडीने दखल घेत अनुदान मंजूर केले आहे.









